दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:52+5:302021-05-08T04:15:52+5:30
उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार लोकमत न्यूज ...
उस्मानिया पार्क परिसर : रस्ते व गटारींचीही सुविधा नाही
उस्मानिया पार्कमधील नागरिकांची व्यथा : उन्हाळ्यात बोअरवेलचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजी नगरला लागून असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे रहिवाशांची गेल्या दहा वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी फिरफिर होत आहे. तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच या परिसरात रस्ते व गटारींचीही समस्या कायम आहे. लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याचीही सुविधा न करण्यात आल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या उस्मानिया पार्क परिसरात गेल्या दहा वर्षांत मोठ्या संख्येने नागरी वस्ती वाढली. मात्र, दहा वर्षांपासून असलेल्या समस्या आजही जैसे थे आहेत. या नागरिकांना सुरुवारीपासून पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. या परिसरात मनपातर्फे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना हुडको व दाळफड या भागातून सायकलीने किंवा दुचाकीने पाणी आणावे लागत आहे. ज्या नागरिकांकडे बोअरवेल आहेत, त्या नागरिकांना जास्त अडचणींचा सामना करावा लागत नसून, बोअर वेल नसलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
हुडको व दाळफड मध्ये नळांना पाणी आल्यावर उस्मानिया पार्क परिसरातील नागरिक, ग्रामीण भागातील नागरीकांना प्रमाणे डोक्यावर किंवा सायकली द्वारे पाणी आणावे लागत आहे. पाणी भरण्यासाठी पुरुषांसह महिलांनाही फिरफिर करावी लागत आहे.
दरम्यान, उन्हाळ्यात तर अनेक नागरिकांच्या बोअर वेलचे पाणी कमी होत असते. त्यामुळे भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचेही येथील महिलांनी सांगितले.
इन्फो :
तरीही पाईप लाईन टाकण्यात आली नाही :
या परिसरातील नागरिकांनी सांगितले की, हुडको व दाळफड या भागात पर्यंत मनपातर्फे पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, उस्मानिया पार्क परिसरात पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरीकांना हुडको व दाळफड भागात पाणी घेण्यासाठी जावे लागत आहे. दरम्यान, मनपातर्फे याच भागात इतक्या वर्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्याचे सांगितले. तसेच या परिसरात गटारी व रस्त्यांचीही सुविधा नाही. यामुळे पावसाळ्यात रहिवाशांचे खूप हाल होत असतात. तर इतक्या वर्षात रस्ते ना गटारींचीही समस्या सोडविण्यात न आल्याने नागरीकांमधून लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
इन्फो :
गेल्या दहा वर्षांपासून नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासन दिले जाते.माञ, अद्याप पाण्याची समस्या न सोडविल्यामुळे आम्हाला हुडको व दाळफड मधून पाणी आणावे लागते. तरी मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
अब्दुल अजीज, रहिवासी
मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची सुविधा न केल्यामुळे आम्हाला हुडको मधून सायकलीने पाणी आणावे लागत आहे. तसेच या ठिकाणी रस्त्यांचीही मोठी समस्या आहे. रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे रहिवाशांचे खूप त्रास सहन करावा लागत असल्याने, प्रशासनाने या समस्याकडे लक्ष दिले पाहिजे.
दानियल शेख, रहिवासी
इन्फो :
गेल्या अनेक वर्षापासून मी या ठिकाणी राहत आहे. मात्र, पिण्याच्या पाण्यासोबतच रस्ते, गटारींची समस्या कायम आहे. पाण्याची समस्या बिकट असून, नागरिकांना इकडून-तिकडून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. उन्हाळ्यात बोअरवेलही आटत असल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तरी मनपा व लोकप्रतिनिधीं यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
इम्रान शेख, रहिवासी