काचेवर फोटो, अर्धवट नंबर; वाहतुक नियम मोडल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांना दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 02:07 AM2020-01-12T02:07:15+5:302020-01-12T02:07:44+5:30
तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांची कारवाई
जळगाव : वाहतूक नियमांचे पालन न केल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांना ४00 रुपये दंड करण्यात आला आहे. पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात त्यांचे जल्लोषात स्वागत झाले होते़ या स्वागतासाठी अनेक वाहने होती़ त्यातील एका कारच्या समोरील काचेवर मंत्री पाटील यांचे छायाचित्र असलेला फलक तसेच वाहनाचा क्रमांकही केवळ ९0 असा लिहिण्यात आला होता. या बाबी वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्या असल्याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी ई-मेलद्वारे वाहतूक पोलीस, पोलीस अधीक्षक यांना १ जानेवारीला तक्रार केली होती़
या तक्रारीची दखल घेतल पोलीस अधीक्षकांनी ६ जानेवारी रोजी वाहतूक विभागाला कारवाईसंदर्भात पत्र दिले होते़ विक्रम पाटील यांच्या नावावर हे वाहन असल्याचे समजते़ ई-चलनाद्वारे हा दंड भरण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे़
काही कार्यकर्त्यांनी उत्साहात चारचाकी वाहनावर फलक लावला असेल. वाहन माझे असले तरी हा प्रकार चुकीचा आहे. दंड झाला तर तो नियमानुसार भरणार आहे. - गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री