व्हिडीओ चित्रण करताना भट्टीत पडल्याने छायाचित्रकार भाजला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:57+5:302021-06-16T04:21:57+5:30
जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील ऑनेस्ट डेरीव्हेटीव्ह या कंपनीचे व्हिडीओ चित्रण करताना जमिनीत असलेल्या भट्टीत पाय घसरुन पडल्याने ...
जळगाव : जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील ऑनेस्ट डेरीव्हेटीव्ह या कंपनीचे व्हिडीओ चित्रण करताना जमिनीत असलेल्या भट्टीत पाय घसरुन पडल्याने मनोहर उर्फ बबलू जगन्नाथ साळी (वय ५५,रा.भूषण कॉलनी) हा छायाचित्रकार भाजल्याची घटना ७ जून रोजी दुपारी घडली. या घटनेत साळी ६५ ते ७० टक्के भाजले असून ज्यांनी या कामासाठी नेले, त्यांनी वाऱ्यावर सोडून आपला संपर्क तोडला आहे. त्यामुळे साळी यांचा खासगी रुग्णालयात संघर्ष सुरु आहे.
साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालदाभाडी येथील ऑनेस्ट डेरीव्हेटीव्ह ही कंपनी सील करण्यासाठी सुरत येथील सीए कैलास शाह हे जळगावात आले होते. अहमदाबाद स्टेट बँकेने सील करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहा यांनी दीपक चौधरी या व्यक्तीला दोन व्हिडीओग्राफर लागतील म्हणून स्वत: चौधरी व साळी यांना तेथे नेले होते. कंपनीचे निम्मे व्हिडीओ चित्रण झाल्यानंतर सपाट जागेवर चालत असताना अचानक पाय खाली गेला. त्यात खाली अग्नीच्या वाफा निघत होत्या. अवघ्या १५ सेंकदात साळी यांचे दोन्ही पाय व कमरेचा भाग भाजला गेला. दोन वर्षापासून कंपनी बंद असल्याचे सांगण्यात येत असतानाच जमिनीत भट्टी कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. साळी यांना तशाच अवस्थेच मालवाहू वाहनातून जामनेर रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मदतीचा झरा आटला
दरम्यान, गेल्या ९ दिवसापासून साळी यांच्यावर उपचार सुरु असून यापुढे खर्च करणेही शक्य होत नाही. अनेकांनी मदत केली, मात्र आता मदतीचा झराही आटला आहे. ज्याने काम दिले, त्या शहा यांनी घटनेच्या दिवसापासूनच संपर्क तोडलेला आहे. लोकमतने देखील त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.