फिजिक्स आणि केमिस्ट्रीने विद्यार्थ्यांना फोडला घाम! एकाच नावाने उडाला गोंधळ
By सुनील पाटील | Published: May 7, 2023 09:19 PM2023-05-07T21:19:08+5:302023-05-07T21:19:44+5:30
परिक्षा केंद्राबाहेर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.
जळगाव : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नीट परीक्षा रविवारी जिल्ह्यात १३ केंद्रांवर पार पडली. फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयांनी विद्यार्थ्यांना प्रचंड घाम फोडला. दर आठवड्याला घेण्यात येत असलेल्या टेस्टपेक्षाही कठीण प्रश्न या परीक्षेत होते, त्यामुळे निम्मेही प्रश्न सोडविणे विद्यार्थ्यांना कठीण गेले. परिक्षा केंद्राबाहेर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.
या परिक्षेसाठी जिल्ह्यात एकूण २ हजार ८८४ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. प्रत्यक्षात २ हजार ८५२ विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली. तर ३२ विद्यार्थी विविध कारणांनी परीक्षा देऊ शकले नाही. ही परीक्षा जिल्ह्यात एकूण १३ केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये जळगाव शहरातील दोन केंद्रांचा समावेश होता.तालुका पातळीवर काही केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा पार पडली. या परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीन विषयांवर एकूण ७२० प्रश्न विचारण्यात आले. बायोलॉजीचे ३६० तर फिजिक्स व केमिस्ट्री या विषयावर आधारित प्रत्येकी १८० प्रश्न होते. या प्रश्नांची सोडवणूक करताना विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक झाली. एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली.
अनेक विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर करण्याचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रस टेस्ट म्हणजेच ‘नीट’ परीक्षा देणे बंधनकारक आहे. यंदाच्या परीक्षेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नांनी घाम फोडला. तुलनेत बायोलॉजीचे प्रश्न तितके अवघड नव्हते, असे काही विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. कोणत्याच परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती नीट परीक्षा जिल्हा समन्वयक प्रा.अब्राहम मॅथ्यू यांनी दिली.
एकाच नावाचे शाळांमुळे गोंधळ
पोद्दार इंटरनॅशनल हे परिक्षेचे केंद्र होते. या नावाने जळगाव चाळीसगाव येथे शाळा आहेत. परिक्षा मात्र चाळीसगाव केंद्रावर होती.त्यामुळे काही विद्यार्थी जळगावच्या शाळेत आले होते. हे केंद्र नसल्याचे कळाल्यावर ते चाळीसगाव रवाना झाले. हा किरकोळ गोंधळ वगळता परिक्षा कुठेही वाद झाला नाही. शांततेत परीक्षा पार पडली.