पिकनिक पॉईंट - गांधीतीर्थ (जळगाव)
By Admin | Published: July 8, 2016 08:53 AM2016-07-08T08:53:20+5:302016-07-08T08:54:22+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारलेले जगातील पहिले आॅडीओ गाईडेड म्युझियम व संशोधन केंद्र 'गांधीतीर्थ' जळगावमध्ये आहे.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ८ - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारलेले जगातील पहिले आॅडीओ गाईडेड म्युझियम व संशोधन केंद्र 'गांधीतीर्थ' जळगावमध्ये आहे. रेल्वे स्टेशनपासून आठ कि.मी. अंतरावर हे गांधीतीर्थ आहे. याचे लोकार्पण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या हस्ते २५ मार्च २०१२ रोजी करण्यात आले होते. देश-विदेशातील पर्यटक येथे भेट देत असतात.
या संशोधन केंद्रात ९ हजार ३१६ पुस्तके, ५ हजार पिरॉडिकल्स, १५२ आॅडीओ स्पीचेस, ८५ चित्रपट, १५ हजार फोटोग्राफ्स् ज्यात गांधीजी व विनोबा भावे यांचे आहेत. ११९ देशांनी प्रकाशित केलेली टपाल तिकिटे, ३ लाख ५२ हजार ९५९ स्कॅन दस्ताऐवज, ४ हजार ३१४ ई बुक्सचा ९ लाख ५० हजार पानांचा डाटा असा अमर्याद माहितीचा दुर्मीळ संग्रह संकलित करून कायमस्वरूपी जतन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारत सरकारच्या नॅशनल आर्काईव्ज या आंतरराष्ट्रीय केंद्रासह अनेक राष्ट्रीय संस्था व व्यक्तींकडील लाखो दस्ताऐवज गांधी रिसर्च फाउंडेशन डिजीटलाईज केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या महाभ्रमण मध्येही गांधी रिसर्च फाउंडेशनचा महाराष्ट्र शासनाने समावेश केलेला आहे.
गांधी तीर्थ हे जोधपूर येथील दगडांपासून तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाने निर्मिती करण्यात आली आहे. शांततामय, प्रदूषणमुक्त व सर्वत्र हिरवळयुक्त अशा नैसर्गिक सौंर्द्याने सजलेल्या जैन हिल्सवर हे संग्रहालय आहे. २०१३-१४ मध्ये ग्रिहा आदर्श तथा आर्टिस्ट इन कॉँक्रिट अवॉर्ड एशिया फे स्टिव्हलमध्ये विजेता भवन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच लीड इंडिया द्वारा ग्रीन बिल्डींग प्लॅटिनम श्रेणीतही पारितोषिक प्राप्त झाले आहे.
संग्रहालयात सूत काढत असतानाचा महात्मा गांधी यांचा हुबेहुब पुतळा असून संपूर्ण संग्रहालय पाहायला २.३० ते ३ तास लागतात. २५० पे्रक्षकांच्या क्षमतेची सुविधायुक्त रंगभूमी असून घोडेस्वारी, बैलगाडी, बॅटरीवर चालणारी कार आणि नौकाविहाराचे अतिरिक्त आकर्षण आहे.