विविधरंगी संस्कृतीचे सुरम्य दर्शन
By Admin | Published: April 22, 2017 06:29 PM2017-04-22T18:29:40+5:302017-04-22T18:29:40+5:30
विविध जाती धर्माच्या विविध मतसंप्रदायाच्या, विविध पूजा पद्धतींचा हा प्रदेश आहे.
खानदेश : अनेक सांस्कृतिक प्रवाहांच्या मिलनाचे केंद्र
विविध जाती धर्माच्या विविध मतसंप्रदायाच्या, विविध पूजा पद्धतींचा हा प्रदेश आहे. मठ, पाठशाळा, धर्मशाळा, वेशी, घाट, मंदिरे, चैत्ये, समाध्या, पोथ्या, हस्तलिखिते, लेणे, स्तूप, शिलालेख, विहिरी, बारवा, जलमांडण्या, तडाग, पुष्करणी, कालवे यासारखे नानाविध ऐतिहासिक संदर्भ खानदेशच्या इतिहासाच्या पाऊलखुणा सांगताना दिसतात. यातून इथल्या विविधरंगी संस्क़ृतीचे सुरम्य दर्शन होते. रुढी, परंपरा, लोकविश्वास, पूजापद्धती, मान्यता, विश्वास, अंधविश्वास, धर्म, कला, ज्ञान-विज्ञान, व्रते-वैकल्ये, श्रद्धा, जन्म-मृत्यूचे संस्कार, आचार-विचार, पोशाख, खानपान या सर्वाचा परिपाक म्हणजे संस्कृती होय.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अविभाज्य अध्याय आहे खानदेश. मराठी संस्कृतीच्या आरंभीच्या पाऊलखुणा खानदेशच्या इतिहासाच्या ओंजळीत साठवलेल्या आहेत. सातपुडा आणि सूर्यकन्या तापी ही खानदेशच्या इतिहासाची मूळ आणि प्रगल्भ अशी साधने होत. तापी आणि गिरणा या नद्यांच्या काठावर झालेल्या उत्खननातून दगडी हत्यारे आढळलीत. ही अश्मयुगाची निशाणी होय. अदमासे लक्ष, दीड लक्ष वर्षापूर्वी आजच्या खानदेशच्या परिसरात मानवी वसाहत नांदत असल्याचे पुरावे आहेत. तापीच्या खो:यात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष असल्याचा अंदाज उत्खननानंतर खरा ठरला आहे. इसवी सन पूर्व एक हजार वर्षापूर्वी तापीच्या खो:यातील ही ताम्रपाषाण संस्कृती इसवी सन पूर्व सातशे वर्षार्पयत तग धरून राहिल्याचे पुरावे आढळतात. प्रकाशा, सावळदा, आणि बहुरूपा ही तीन स्थाने या दृष्टीने मोलाची होत. यानिमित्त एकशे तीन वसाहतींचा अभ्यास झाला. इथे सापडलीत मातीची भांडी. यांची जडण-घडण, रंग व नक्षीकाम आकार आणि भाजण्याची पद्धत यावरून हा अभ्यास मुख्यत्वेकरून झाला. महाराष्ट्रातले आद्य शेतकरी तापी खो:यात उदयास आले. ताम्रपाषाणयुगीन लोकांचे दागिने या भागात आढळले आहेत. यात मणी, बांगडय़ा, कानातील आभूषणे मुख्य आहेत. यांचा आकार गोल, लंबगोल व चपटा आहे. या काळातील समाजाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे. ही व्यवस्था नायकप्रधान होती. सर्वसामान्य घरे चौकोनी, आयताकृती वा गोल आकाराची होती. घरावर गवताचे वा मातीचे उतरते छप्पर असायचे. घराची जमीन काळ्या व पिवळ्या मातीने चोपून तयार केलेली असायची. या भागात मृत नायकाला एका रांजणात ठेवत. रांजणाला चार खूर असत.
महाराष्ट्राच्या जडण-घडणीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भ यांच्याबरेाबरच खानदेशचे वैशिष्टय़पूर्ण असे स्थान आहे. खानदेश संरक्षणाच्या डावपेचांसाठी अतिशय उपयुक्त असा भूभाग असल्यामुळे विविध राजसत्तांना आपली मांड ठोकण्यासाठी या प्रदेशाचा वेळोवेळी आश्रय घ्यावा लागला आहे. यातूनच या प्रदेशाचे स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व आकाराला आले. अनेक सांस्कृतिक प्रवाहांच्या मिलनाचे हे केंद्र बहुसमावेशी स्वरूपाचे आहे. पूर्वेकडील ब:हाणपूरचा घाट ते पश्चिमेकडील नवापूरच्या घाटादरम्यान ताम्हणात देवपूजेसाठी सजवलेल्या देवप्रतिमेसारखे तापी खोरे. खानदेशच्या उत्तर पश्चिम भागात सातपुडय़ाच्या रांगा, दक्षिणेकडचा सह्यगिरी, उत्तर दक्षिण आणि उत्तर पश्चिम दिशांना जोडणारे घाट आहेत. यामुळे तोरणमाळच्या सुरम्य हाका, सातमाळाच्या रांगांची मोहक रंगसंगती, सह्याद्रीच्या पर्वतश्रेणीने केलेले गोदा खो:याचे विभाजन यामुळे वन्य आणि नागर जीवनाचा मनोहारी मिलाफ खानदेशचे वैशिष्टय़ आहे. खानदेश भौगोलिकदृष्टय़ासुद्धा अनेक सांस्कृतिक प्रवाहांच्या मिलनाचे केंद्र आहे.
खानदेश आणि अभीर हे एक जीवाभावाचे नाते आहे. तसे पाहू गेल्यास खानदेशात आभिरांचा एकही शिलालेख उपलब्ध नसला, तरी महाभारत काळापासून अभीर आणि खानदेश यांचे नाते आहे. आभीर कुलांची या भागातील नेमक्या कुठल्या भूभागावर सत्ता होती, हे जरी ठामपणे सांगता येत नसले तरी अंजनेरी (नाशिक) पासून तर गाविलगड (अमरावती) र्पयतच्या भूभागात त्यांच्या राजधान्यांची स्थित्यंतरे झाली असल्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. पाचव्या सहाव्या शतकात आभिरांच्या माथ्यावर चौ:या ढाळल्या जात असल्याचे उल्लेख आढळतात. सर्वात पुरातन वायू पुराणांतर्गत आभिरांच्या वंशावळीचा आढळणारा इतिहास त्यांच्या पुरातनत्त्वावर शिक्कामोर्तब करणारी घटना आहे. या सर्व तपशीलांचा अर्थ असा होतो की, इसवी सन पूर्व काळापासून आभीर आपल्या प्रदेशात येऊन वसले होते. आभिरांची बालदेवता आहे श्रीकृष्ण. त्यांचा सर्वात प्राचीन उल्लेख हरिवंश पुराणात आढळतो. भांडारकरांनी या पुराणाचा काळ इसवी सन तिस:या शतकाचा मानला आहे. या परिसरातले लोक स्वत:ला गवळी, अहीर, आभीर, म्हणवून घेत असत. हा गवळीवंश, यदुवंश, नंदवंश तथा ग्वालवंश म्हणून भारतभर पसरला आहे.
खानदेशाला जे ऐतिहासिक स्थैर्य लाभले त्याचा विचार करून जाता असे लक्षात येते की, इसवी सन पूर्व पाचशे ते इसवी सन पाचशे हा खानदेशच्या सांस्कृतिक विकासाला पोषक असा कालखंड होता. इसवी सन सातव्या ते अकराव्या शतकाचा काळ मात्र सांस्कृतिकदृष्टय़ा पडझडीचा काळ आहे. त्यानंतर पंधराव्या शतकार्पयतचा कालखंड अनुकूल तर एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पुन:श्च पोषक असल्याचे आढळून येते. पुढे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून परत एकदा अनुकूल कालखंड आहे. खानदेशला बळकट अशा प्रदीर्घ मौखिक परंपरेची पाश्र्वभूमी लाभली आहे. यात दंतकथा, लोककथा, लोकगीते, आख्याने, पोवाडे आदींचा अंतर्भाव होतो. यासोबतच खानदेशच्या लोकदेवतांच्या आणि लोकविश्वासांच्याही नानाविध अद्भुतरम्य कथानकांचा उपयोग इथल्या लोकसंस्कृतीची उकल करायला मदत करतो. लिखित साधनांमध्ये रामायण, महाभारत, पुराणे, उपपुराणे, स्मृती साहित्य, जैन व बौद्ध साहित्य, जैन रामायण आदींचा अंतर्भाव होतो. व्यापारी महामार्गाने खानदेशचा बराचसा भाग व्यापला असल्यामुळे सातवाहन, आभीर, त्रेकुटक, कलचुरी, यादव आदी नाणी खानदेशात अनेक ठिकाणी आढळली आहेत. पितळखोरा, अजिंठा, बाग येथील लेण्या, शिल्पाकृती, चित्राकृती खानदेशचे वैभव आहे. या गिरीशिल्पांसोबतच जललेणेही एक वैशिष्टय़ आहे. खानदेशातील दुर्गनिर्मिती हे अध्ययनाचे एक झगमगते पृष्ठ आहे. भामेर, साल्हेर, मुल्हेर, नरनाळा, मालेगाव, त्रिंबक, थाळनेर, अशीरगड येथील अवशेषदेखील या संदर्भात मोलाची माहिती पुरवतात.
खानदेशच्या बदलत्या राजसत्तांचा अभ्यास हा मोठा मनोरम विषय आहे. आभीर नृपतींच्या सोबतच थाळनेरचे कुंभकर्ण घराणे, वत्सगुल्मचे वाकाटक घराणे, महिष्मतीचे कलचुरी घराणे, बदामीचे चालूक्य घराणे, बदामीच्या चालुक्यांचे सामंत घराणे सेंद्रक, यादव घराणे, पुलकेशी, राष्ट्रकूट, दंतीदुर्ग यासारख्या विविध राजघराण्यांच्या परंपरांशी खानदेशचा एक भावपूर्ण संबंध दिसून येतो. खानदेशच्या कुळकथेचा विचार करताना अशा प्रकारे विविध संदर्भ मूल्यांची फेर धरत चालणारी नृत्यमगA अशी संदर्भ गाथा विशिष्ट आहे.
या प्रदेशाला खानदेश नाव केव्हा व कसे पडले या विषयी आजही भिन्नभिन्न मते आहेत. ऋषिक देश, स्कंद देश, खंड देश, खांडव देश, सेऊण देश, कान्ह देश, कन्न देश, आभीर देश आणि खानदेश विविध नामाभिधानांनी हा प्रदेश ओळखला जातो. तापीच्या खो:यातील संस्कृती सिंधू संस्कृतीच्या समकालीन ठरते. लहान बंधा:यांना कान या नावाने संबोधले जाते. अशा छोटय़ा बंधा:यांचा प्रदेश म्हणून कन देश व खान देश अशीही एक व्युत्पत्ती आढळते.
- प्रा.डॉ. विश्वास पाटील