लोहारी येथे पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधत चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 07:04 PM2019-08-30T19:04:59+5:302019-08-30T19:07:29+5:30
लोहारी येथे बसस्थानक रस्त्यावर असलेल्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनला घडली. दोन ठिकाणच्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधला. या घटनेत ४० हजार रोख रक्कम व ९२ हजारांचे सोन्याचे दागिने असा मिळून एकूण एक लाख ३२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या लोहारी येथे बसस्थानक रस्त्यावर असलेल्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी पहाटे तीनला घडली. दोन ठिकाणच्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पिठोरी अमावस्येचा मुहूर्त साधला. या घटनेत ४० हजार रोख रक्कम व ९२ हजारांचे सोन्याचे दागिने असा मिळून एकूण एक लाख ३२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. जळगाव येथून श्वानपथक बोलविण्यात आले होते. हॅप्पी नामक श्वानाने वरखेडी-पाचोरा रस्त्यापर्यंत माग दाखविला व येथपर्यंतच हॅप्पी घुटमळला. हे.काँ. साहेबराव चौधरी यांनी हाताच्या बोटांचे ठशाचे नमुने घेतले.
या घटनेत डॉ.भूषण मन्साराम महाजन यांच्या बंद घराच्या दरवाज्याचा कोंडा तोडून कपाटातून चार ते पाच तोळे सोन्याचे दागिने लांबविले. यात २० ग्रॅमची मंगलपोत, पाच ग्रॅमच्या गळ्यातील दोन चेन, एक ग्रॅमच्या चार अंगठ्या, नऊ ग्रॅमचे कर्णफुल तसेच चार ग्रॅमचे ओम पान, सटी इ.सह ९२ हजारांचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये रक्कम लंपास केली. डॉ.भूषण महाजन हे अधूनमधून पाचोरा येथे आपल्या वडिलांकडे जातात. गुरुवारी रात्रीदेखील ते पाचोरा येथे आपल्या वडिलांकडे मुक्कामी होते.
शुक्रवारी सकाळी डॉ.महाजन यांचा कंपाऊंडर मुलगा दूध घेऊन आला असता त्याने दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला पाहिला. तेव्हा घरमालक गजानन पाटील यांना फोनवरून माहिती दिली, तर एका घराच्या आड असलेल्या वसंत देवचंद नाथ यांच्या घरीदेखील चोरट्यांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. परंतु नाथ परिवाराने आपल्या घरातील रक्कम व दागिने कपाटात न ठेवता सुरक्षितपणे एका डब्यात ठेवल्याने ते चोरट्यांच्या हाती लागले नाही. वसंत नाथ यांची पत्नी २७ पासून आजारी असल्याने पाचोरा येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने पती-पत्नी दोघेही या रुग्णालयामध्येच होते.
पिंपळगाव (हरेश्वर)पोलीस स्टेशनचे स.पो.नि.रवींद्र बागुल यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी श्वानपथक व असे तज्ज्ञांचे पथक याठिकाणी बोलवून पंचनामा केला.
पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना केली.
पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी सात संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही.
डॉ.महाजन यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, हे.कॉ.हरी पवार, सचिन वाघ, विजय माळी, राजेंद्र पाटील करीत आहेत.
दोनच दिवसांपूर्वी ‘लोकमत’मधून या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले होते. हे वृत्त म्हणजे वास्तव परिस्थिती दर्शविणारे होते. हे या घटनेवरून लक्षात येते.