पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलालगत होणार ‘आर्म’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:57+5:302020-12-15T04:32:57+5:30
पुलाची अंदाजित लांबी - ५०० मीटर रुंदी - ८ मीटर आर्मची लांबी - १२० मीटर पुलाला अंदाजित खर्च - ...
पुलाची अंदाजित लांबी - ५०० मीटर
रुंदी - ८ मीटर
आर्मची लांबी - १२० मीटर
पुलाला अंदाजित खर्च - ४५ कोटी
-५ लाख नागरिकांना होणार फायदा
-तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांचा ३ किमीचा फेरा वाचणार
-पिंप्राळा रेल्वेगेटवर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून होणार सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाला निधी मंजूर होऊन दोन वर्ष झाल्यावरदेखील अद्याप कामाचा मुहूर्त सापडलेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून
‘आर्म’च्या फेऱ्यात या पुलाचे काम थांबले होते; मात्र आता रेल्वेने तयार केलेल्या नवीन डिझाइनमध्ये ‘आर्म’चादेखील समावेश केल्यामुळे आता भोईटे नगरकडून या पुलाला आर्म जोडला जाणार असून, या आर्मसाठी काही जागा भूसंपादित करावी लागणार असून, ही जागा भूसंपादित करण्यासाठी खर्चाला मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने पहिल्यांदा पिंप्राळा उड्डाणपुलासाठी तयार केलेल्या आराखड्यात भोईटेनगरकडून येणारा रस्ता पुलाला जोडलेला नव्हता.
त्या ऐवजी रेल्वेने भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मनपाकडे ठेवला होता; मात्र हा प्रस्ताव मनपाने तहकूब ठेवून भोईटेनगरकडून
येणारा रस्तादेखील उड्डाणपुलाला जोडण्याचा सूचना तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड. शुचिता हाडा यांनी दिल्या होत्या; मात्र रेल्वेकडून
या ठिकाणी आर्मला मंजुरी देणे टाळण्यात येत होते. यासाठी गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होऊन ‘महारेल’ला नवीन डिझाइन तयार करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रेल्वेने तयार केलेल्या नवीन डिझाइनमध्ये ‘आर्म’चा समावेश असल्याने पुलाच्या कामाला आता सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भूसंपादनाचा मार्ग मोकळा होण्याची गरज
रेल्वेने नवीन डिझाइन दिल्यानंतर १६ रोजी होणाऱ्या महासभेत हा आर्मच्या कामासाठी भोईटेनगर भागातील काही मालमत्ता बाधित होणार आहेत.
या मालमत्ताधारकांच्या जागा भूसंपादित करण्यासाठी मनपाला आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. यासाठी भाजपच्या नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी प्रस्ताव सादर केला आहे. महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर मनपाकडून लवकरच या जागा भूसंपादित करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
५ लाख नागरिकांना होणार फायदा
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या सुमारे ५ लाख नागरिकांना फायदा होणार आहे. तसेच या पुलाला
आर्म जोडल्यास भोईटेनगर, खोटेनगरसह पिंप्राळा भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठीचा नवीन पर्यायदेखील उपलब्ध होणार आहे.
असा होणार पूल
१. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या आराखड्यानुसार कानळदा रस्त्यालगतच्या एस.के. ऑइल मिलकडून थेट रिंगरोडपर्यंत हा उड्डाणपूल तयार
करण्यात येणार आहे.
२. सुरत रेल्वे लाइन व मुंबई रेल्वे लाइनवरून हा पूल होणार आहे.
३. भोईटेनगर भागाकडूनही पुलावरून नागरिकांना ये-जा करता येणार आहे.
४. रेल्वेच्या महारेल या कंपनीकडून हा पूल तयार करण्यात येणार असून, आर्मचा मार्ग मोकळा झाल्याने पुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होऊ शकते.
कोट..
रेल्वेने नव्याने दिलेल्या डिझाइनमध्ये आर्मचा सहभाग करून घेतला आहे. आर्मची लांबी काही प्रमाणात कमी केली असून, यामुळे आधी ज्या मालमत्ता बाधित होणार होत्या, त्या आता बाधित होणार नाहीत. काही मालमत्ता बाधित होणार असल्या तरी मनपाकडून लवकरच मालमत्ताधारकांना योग्य रक्कम देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
-ॲड. शुचिता हाडा, नगरसेविका