जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ वाहतूकीची कोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 04:37 PM2018-02-14T16:37:16+5:302018-02-14T16:41:50+5:30
वाहतूक पोलीस गायब : प्रवाशी व मालगाड्यांना होतोय खोळंबा
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.१४ : बजरंग बोगद्याच्या कामामुळे त्या मार्गावरील वाहतूक पिंप्राळा रेल्वे गेटकडून वळविण्यात आल्याने या भागात वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. गेट बंदचा सिग्नल मिळाल्यानंतरही वाहनधारक गेटमधून निघण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे दोन्ही गेटच्या मध्येच वाहने अडकत असल्याने त्याचा परिणाम म्हणून त्यावेळी जाणा-या प्रवाशी रेल्वेगाड्या व मालगाड्यांना काही अंतरावर थांबवून ठेवावे लागत आहे.
बजरंग बोगदा धोकादायक झाल्याने रेल्वे प्रशासनाकडून या जागी नवीन बोगदा टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गणेश कॉलनी व पिंप्राळाकडून या बोगद्यातून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक भोईटे नगर रेल्वे गेटकडून वळविण्यात आली आहे. सर्वच अवजड तसेच लहान मोठी वाहने या रस्त्याने जात असल्याने रेल्वे गेटजवळ वाहतूकीची प्रचंड कोंडी होत आहे. ही कोंडी दूर करताना रेल्वे कर्मचारी व आरपीएफ नाकीनऊ आले आहेत.