वर्षभरात २ लाख २२ हजार कुटुंबांना नळकनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:21 AM2021-02-17T04:21:20+5:302021-02-17T04:21:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील ५५ हजार कुटुंबांकडे अद्याप नळकनेक्शन नाही. त्यांना या जलजीवन मिशन योेजनेचा फायदा मिळालेला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ५५ हजार कुटुंबांकडे अद्याप नळकनेक्शन नाही. त्यांना या जलजीवन मिशन योेजनेचा फायदा मिळालेला नसल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. जिल्ह्याला जलजीवन मिशन योजनेत २ लाख ७८ हजार २१३ कुटुंबांना नळकनेक्शन देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १५ फेब्रुवारीपर्यंत २ लाख २२ हजार ६७७ कुटुंबांना नळकनेक्शन देण्यात आले होते.
जिल्ह्यात एकूण ६ लाख ८६ हजार कुटुंबे आहेत. त्यापैकी ४ लाख ८ हजार २२७ कुटुंबांकडे मार्च २०२० च्या आधीच नळ कनेक्शन होते. मात्र, आता या उर्वरित कुटुंबांनादेखील नळजोडणी देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांना १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्हा आता ८० टक्के उद्दिष्टाच्या जवळ पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यातील फक्त ५५ हजार ५०० कुटुंबांना नळकनेक्शन मिळालेले नाही. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अजून दीड महिन्याचा कालावधी आहे. या योजनेसाठी १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी उभारला जातो.