लांडोरखोरी वनोद्यानासाठी मेहरूणमधून पाईपलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:17 PM2018-04-03T13:17:38+5:302018-04-03T13:17:38+5:30

उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांची माहिती

 Pipeline from Mehrun to landorkhori | लांडोरखोरी वनोद्यानासाठी मेहरूणमधून पाईपलाईन

लांडोरखोरी वनोद्यानासाठी मेहरूणमधून पाईपलाईन

Next
ठळक मुद्दे कुंभारखोरीचा विकास करणार वनजमिनींचा विषय गंभीरबछड्याचा मृत्यूनंतर विमानतळावरील काम बंद

जळगाव : लांडोरखोरीत पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्हानियोजनसमितीतून निधी मंजूर झाला असून मेहरूण तलावातून पाईपलाईन टाकून पाणी घेतले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी ‘लोकमत’ भेटीप्रसंगी दिली.
ते म्हणाले की, शहरातील मोहाडी व शिरसोली रस्त्याच्या मध्ये असलेल्या लांडोरखोरी वनउद्यानाच्या विकासानंतर त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. आतापर्यंत सुमारे हजार च्या आसपास लोकांनी या उद्यानाचे पास घेतले आहेत. मात्र या ठिकाणी पाण्याची टाकी असूनही पाणीटंचाई आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मेहरूण तलावातून पाईपलाईन टाकून पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी डीपीडीसीतून निधी देखील मंजूर झाला असल्याचे सांगितले. उंचावर असलेल्या टाकीमुळे दाबाने पाणीपुरवठा सर्व भागात होईल.
बछड्याचा मृत्यूनंतर विमानतळावरील काम बंद
जळगाव विमानतळावरील सपाटीकरणाचे काम करताना बिबट्याच्या दोन बछड्यापैकी एका बछड्याचा जेसीबीच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी संबंधीत जेसीबी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जेसीबी जप्त करण्यात आला आहे. तसेच विमानतळावरील काम बंद करण्यात आले आहे. वनविभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय हे काम सुरू न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पगार यांनी दिली. एका बछड्याचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या बछड्याला विमानतळावरील त्याच ठिकाणी ठेवून ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला होता. त्यात मादी बिबट्याने त्या पिलाला उचलून १००-२०० मीटर अंतरावर सोडून दिले होते. त्यानंतरही आठवड्याभरापूर्वी ही मादी बिबट्या या परिसरात आल्याचे ट्रॅप कॅमेºयात दिसून आले असल्याची माहिती पगार यांनी दिली.
वृक्षलागवडीबाबत ४ रोजी सचिवांची बैठक
५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत यावर्षी राज्यात १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या अतंर्गत जिल्ह्याला ४२ लाख ४७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १२ लाख ५६ हजार, जळगाव वन विभागास ६ लाख, यावल वन विभागास १३ लाख ७३ हजार, सामाजिक वनीकरण विभागास ६ लाख तर इतर विभागांना ३ लाख १८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात ४६ लाखापेक्षा अधिक रोपे तयार आहेत. तसेच ४ रोजी नाशिक येथे सचिवांनी आयुक्तांची बैठक बोलावली असून त्यात जिल्हाधिकारी या वृक्षलागवडीबाबत सादरीकरण करतील, अशी माहिती पगार यांनी दिली.
वनजमिनींचा विषय गंभीर
शासनाने वनक्षेत्र वाढवून ३३ टक्के करण्याचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे जंगलातील मूळ अधिवास असलेल्या नागरिकांवरही अन्याय होऊ नये यासाठी वनजमिनी हक्क कायदा आणला. मात्र त्या कायद्याचा गैरफायदा घेण्यासाठी वनजमिनीवर अतिक्रमण करून दावे करण्याचे प्रमाण वाढले आहे. ती चिंतेची बाब आहे.
मात्र असे दावे अपात्र करण्यात आले आहेत.
सर्पमित्रांना दिले ओळखपत्र
सर्पमित्रांबाबत राज्यात काही ठिकाणी विषाची विक्री करत असल्याच्या तक्रारी आल्याने ओळखपत्र देण्याचा निर्णय शासनने घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व सर्पमित्रांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मात्र त्यांनी साप पकडल्यानंतर स्वत:कडे २४ तासांपेक्षा जास्तवेळ ठेवता येणार नाही. त्याला सुरक्षीत ठिकाणी जंगलात सोडून द्यावे लागेल.
नुकसानीचे सर्व दावे निकाली
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना अथवा पाळीव प्राण्यांची हत्या झाल्यास त्याचे नुकसान भरपाईचे दावे वनविभागाकडून तातडीने निकाली काढले जातात. दरवर्षी सुमारे सव्वा दोन ते अडीच कोटी रूपये नुकसान भरपाईवर खर्च होतात. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या वृद्धाच्या वारसांना १ लाख रूपये तातडीने देण्यात आले. तर ७ लाख रूपये वारसाच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझीट ठेवण्यात आले आहेत. ३१ मार्च अखेर १०० टक्के नुकसान भरपाईचे दावे निकाली काढले असल्याची माहिती पगार यांनी दिली.
वनविभागाला यश
लांडोरखोरी वनक्षेत्राचा विकास करण्यात वनविभागाला यश आले आहे. शहराच्या जवळच एवढे मोठे वनक्षेत्र संरक्षित आहे. त्याच प्रमाणे कुंभारखोरी वनक्षेत्राचाही विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे दिगंबर पगार यांनी यावेळी सांगितले.
ट्रॅप कॅमेरे पुरेसे
उपवनसंरक्षक पगार म्हणाले की, जळगाव वनविभागाकडे पूर्वीचे १७ ट्रॅप कॅमेरे होते. आता नव्याने २२ ट्रॅप कॅमेरे घेण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्राण्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होते.

Web Title:  Pipeline from Mehrun to landorkhori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.