नियोजित हुतात्मा स्मारकात निमलष्करी दलालाही स्थान द्या! शहिदांच्या पत्नींनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2023 03:48 PM2023-09-15T15:48:53+5:302023-09-15T15:50:12+5:30
मनसेकरवी निवेदन सादर
कुंदन पाटील, जळग़ाव : मेहरुण तलावावर नियोजित हुतात्मा स्मारकात १८ शहिद जवानांची शौर्यकथा साकारली जाणार आहे.या स्मारकात निमलष्करी दलातील शहिद जवानांनाही स्थान देत त्यांची शौर्यकथा साकारावी, अशी मागणी मनसेच्यावतीने वीर पत्नींनी केली.
अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शहिद जवानांच्या पत्नींनी भावनाही मांडल्या. निमलष्करी दलातील शहिद जवानांची संख्या मोठी आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबीसारख्या निमलष्करी दलात जिल्ह्यातील शेकडो जवानांकरवी सेवा दिली जात आहे. निमलष्करी दलातील जवान शहिद झाल्यावर त्यांच्यावर शासकीय संहितेनुसार अंत्यसंस्कार होतात.त्यामुळे सादर करीत असलेल्या शहिद जवानांची शौर्यकथा नियोजित स्मारकात साकारण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भारती कोल्हे, फरीदा बी, वंदना पाटील, अर्चना नरेंद्र महाजन यांनी भावना मांडल्या. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, सचीव महेंद्र सपकाळे, उपमहानगराध्यक्ष आशीष सपकाळे, ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, राजेंद्र निकम, श्रीकृष्ण नेमाडे, सागर शिंपी, विज सपकाळे, नितीन जोशी आदी उपस्थित होते.