नवस फेडण्यासाठी या ठिकाणी वाटला जातो गुळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:14 PM2018-12-11T22:14:43+5:302018-12-11T22:19:58+5:30
भैरवनाथ महाराज नवसाला पावतात ही भाविकांची श्रद्धा आहे. संकट टाळण्यासाठी याठिकाणी नवस मानले जातात.
महिंदळे ता.भडगाव : महिंदळे येथील शंभर वर्षांची परंपरा असलेल्या व पाच दिवस चालणा-या भैरवनाथ यात्रोत्सवास विविध सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांनी सुरूवात झाली.या यात्रोत्सवात किर्तन व्याख्यानाने सुरूवात होते. १३ रोजी सकाळी भैरवनाथ अभिषेक सोहळा व भव्य पालखी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण बारा गाड्या ओढणे हे आहे. धनसिंग भिल हे एकटे बारा गाड्या ओढतात.
नवस फेडण्यासाठी गुळ वाटण्याची प्रथा
भैरवनाथ महाराज नवसाला पावतात ही भाविकांची श्रद्धा आहे. संकट टाळण्यासाठी याठिकाणी नवस मानले जातात. आपली दुभती गुरे आजारी पडली तरीही येथे नवस मानले जातात. तर काही जण अपत्यप्राप्तीसाठी नवस मानतात. ज्याचा नवस मानलेला आहे, त्याच्या अंगावर दगड उतरवून ठेवतात व त्या दगडांच्या वजना इतक्या गुळाचे वाटप केले जाते. काही जण त्या व्यक्तीच्या वजना इतका गुळ वाटप करतात. यासोबतच वरण बट्टीचाही नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात.
पूर्र्वी सर्प दंश झालेल्या व्यक्तीस याठिकाणी आणून सर्प विष उतरविले जात असल्याचे जाणकार सांगतात. आजही काही भाविक सर्प दंश झाल्यास भैरवनाथांचा धावा करतात व नवस मानतात.