मातृप्रेमावर दगड ठेवून कोरोना रुग्णांना लावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:37 PM2020-10-04T17:37:32+5:302020-10-04T17:39:26+5:30
कोरोनाचा नायनाट केल्याशिवाय आमचे कर्तव्य थांबणार नाही, असा दृढनिश्चयच कोविड रुग्णालय सांभाळणाऱ्या महिला डॉक्टर, नर्स या रणरागिणींनी केला आहे.
संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : आपल्या लहान बाळांना वृद्ध आई-वडील, सासू-सासरे यांच्याकडे ठेवून रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्या कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्या यशस्वी लढ्याने अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. कोरोनाचा नायनाट केल्याशिवाय आमचे कर्तव्य थांबणार नाही, असा दृढनिश्चयच कोविड रुग्णालय सांभाळणाऱ्या महिला डॉक्टर, नर्स या रणरागिणींनी केला आहे.
अमळनेर तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर व प्रताप महाविद्यालयात कोविड केयर सेंटर आहेत. दोन्ही ठिकाणी महिला डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करीत आहेत.
डॉ.वर्षा पाटील या आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून कोरोना काळात रुजू झाल्या. त्यांचे पती डॉ.प्रशांत पाटील हेही कोविड सेंटरला सेवा देत आहेत. आपल्या पाच वर्षांच्या मुलाला वयस्कर सासूच्या स्वाधीन करून कर्तव्यावर यावे लागते. घरी गेल्यावर मुलाला चेहराही दाखवता येत नाही. मास्क घालून त्याच्याशी बोलावे लागते. मातृत्वावर दगड ठेवून कोविड रुग्णांसाठी मायेचा पाझर फोडावा लागतो. अंगात ताप आणि अंगदुखी असतानाही सारे दुखणे विसरून आधी कर्तव्याला प्राधान्य देत आहोत. कोविड सेंटरला काम करतो म्हणून परिसरातील, आजूबाजूच्या नागरिकांनी टाकलेल्या सामाजिक बहिष्काराला सामोरे जाताना मनाला दु:ख होते, पण अनेकांना जगण्यासाठी आपण धीर देतो याचा आनंद आहे, असे सांगून वर्षा पाटील म्हणाल्या की, दीपिका साळुंखे आणि त्यांचे पती पॉझिटिव्ह आले. आॅक्सिजन ६५ ते ७० होता. रुग्ण मानसिकदृष्ट्या खचले होते. त्यांना भक्कम केले. उपचार केले आणि ते सुखरूप घरी गेले.
माधवी गायकवाड या परिचारिकेने सांगितले की, अडीच वर्षाची मुलगी घरी आई-वडिलांजवळ टाकून येते. त्यांना मधुमेह, रक्तदाब आहे, त्यांची काळजी घेण्याची स्थिती असताना त्यांना दुर्लक्षित करून रुग्णांजवळ जावून इंजेक्शन, औषधी देऊन त्यांना आधारही द्यावा लागत आहे. सेवा करताना स्वत: पॉझिटिव्ह आली. १४ दिवस क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. बाराव्या दिवशी पुन्हा सेवेत हजर झाली. अडीच वर्षाच्या मुलीचे तोंडही पाहता आले नव्हते. कोरोनाच्या वेदनेपेक्षा मायेच्या वेदना खूप होत्या. मात्र कर्तव्याने त्या वेदनांनावर फुंकर घालून मनाला खूप आनंद दिला आहे. २७ वर्षांचा संदीप जिजाबराव पाटील ग्रामीण रुग्णालयात आला. त्याचा आॅक्सिजन ६७ होता. परंतु त्याला धीर दिला, लक्ष दिले. त्याची स्वत:ची मानसिकता बळकट होऊन तो घरी गेला.
यासह डॉ.शिरीन बागवान यादेखील पाच वर्षांच्या मुलाला जळगावला ठेवून सेवेसाठी येतात. डॉ.आरती नेरपवार, डॉ.तनुश्री फडके यादेखील आपल्या परिवाराला सोडून कोरोनाग्रस्तांची सेवा करीत आहेत. निखद सय्यद परिचारिका सेवा करताना पॉझिटिव्ह आल्या. पुन्हा लगेच सेवेत हजर झाल्या. कल्याणी बडगुजर आपल्या दोन वर्षांच्या मुलीला डायलिसिसची रुग्ण असलेल्या सासूजवळ सोडून कोरोनाग्रस्ताची सेवा करतेय. राजश्री पाटील १० जणांचे कुटुंब सोडून घरातील तीन ते १३ वर्षांची चार मुले वाºयावर सोडून रुग्णसेवेत वेळेवर हजर होते. त्यांच्यासह प्रमुख परिचारिका सुवार्ता वळवी, शुभांगी श्रावणे, सोनाली महिरास, कोमल सस्तरने, प्रगती वानखेडे, लता चौधरी, पूनम नेरे, वैशाली चव्हाण या महिला परिचारिका, वार्ड लेडी आपली सेवा चोख बजावत आहेत.
कोरोनाचा कहर माजला होता. तेव्हा अनेकांनी या महिलांना सांगितले की, सोडा ही नोकरी, परंतु काहींचे पती त्यांच्यासोबत सेवेत आहेत. त्यांनी पाठबळ दिले, काहींनी स्वत:च ठाम निश्चय केला की, हीच सेवा करायची.
चार पाच रुग्ण असे होते की, त्यांना खासगी रुग्णालयात नेऊनही फरक पडला नव्हता. रुग्ण जीव गमावतात की काय अशी स्थिती होती. त्यांना विश्वासात घेऊन ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यांना प्रेमाने धीर दिला. बळ दिले. वेळेवर औषधी दिल्या. स्वत:चा डोळा लागू दिला नाही. मात्र त्या रुग्णांची काळजी घेतली. काही दिवसात ते सुखरूप परतले आणि जाताना त्यांनी व्यक्त केलेले ऋण व शेरेबुकात दिलेला शेरा आम्हाला आणखी ताकद देऊन गेला. यापेक्षा अधिक आनंद काय असेल, अशा भावना या महिला कर्मचाºाांनी व्यक्त केल्या.
रुग्ण दाखल करायला बेड उपलब्ध नसायचा. नातेवाईक केविलवाणे होऊन विनवण्या करायचे. तडजोड म्हणून खालीदेखील बेड टाकून त्याही रुग्णांना वाचवून घरी रवाना केले, परंतु कंटाळा कधीच केला नाही.