अखंडित पुरवठ्यासाठी रक्तसंकलनाचे नियोजन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:33 AM2020-12-12T04:33:08+5:302020-12-12T04:33:08+5:30
जळगाव : कोरोना संसर्गामुळे रक्तदान शिबिर व रक्त संकलन कमी होण्यासह दातेही पुढे येत नसल्याने रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे ...
जळगाव : कोरोना संसर्गामुळे रक्तदान शिबिर व रक्त संकलन कमी होण्यासह दातेही पुढे येत नसल्याने रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. यासाठी पुरेसे रक्तसंकलन व्हावे यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रक्तपेढी चालकांना दिल्या. सध्या ६०० रक्तपिशव्या उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये; मात्र आपत्कालीन स्थितीत पुरेसे रक्त उपलब्ध राहावे यासाठी दात्यांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे वृत्त पुढे येत असल्याने जिल्ह्यातीलही रक्त साठ्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राऊत यांनी रक्तपेढी चालकांची शुक्रवारी संध्याकाळी बैठक घेतली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयाच्या रक्तपेढीसह खाजगी व स्वयंसेवी संस्थांच्या रक्तपेढीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हाधिकार्यांनी प्रत्येक रक्तपेढीच्या उपलब्ध साठ्याची माहिती घेतली. यामध्ये सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीत सर्वाधिक म्हणजेच ११२ रक्तपिशव्या उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्वयंसेवी व खासगी रक्तपेढीतील साठ याचीही माहिती घेतली. मात्र हा साठा दरवर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे समोर आले. दररोज जवळपास १५० ते १६० रक्त पिशव्यांची मागणी असल्याने सध्याचा उपलब्ध साठा पाहता तो जास्तीत जास्त आठवडाभर पुरेल एवढाच आहे. आज रुग्णांनी मागणी केली तरी त्यांना रक्त मिळू शकेल त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र दर वर्षाचा साठा व सध्या उपलब्ध रक्त पाहता आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास पुरेसा साठा उपलब्ध राहावा व सध्या नियमित शस्रक्रियादेखील सुरू झाल्याने रक्ताची मागणी वाढू शकते, त्यादृष्टीने दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
शैक्षणिक, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे नियोजन पाहून संकलन करा
सध्या शाळा-महाविद्यालये बंद असली तरी शैक्षणिक संस्थांमध्ये आवाहन करण्यात येऊन तसेच एनसीसी, नेहरू युवा केंद्र व इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने रक्तदान शिबिर आयोजित करावे तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसाचे नियोजन करून सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यासह त्या त्या पक्षाकडून रक्तदानाविषयीची माहिती घ्यावी व त्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी रक्तपेढी चालकांना दिल्या.
दररोज अद्ययावत माहिती अपलोड करा
प्रत्येक जिल्ह्यात किती रक्तसाठा उपलब्ध आहे, याची योग्य माहिती दररोज संबंधित यंत्रणेकडे अपलोड करावी. जेणेकरून रक्तसाठा कमी आहे की नाही याची माहिती राज्याला उपलब्ध होऊ शकेल व नागरिकांमध्येही घबराट पसरणार नाही, यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे, अशा सूचनादेखील जिल्हाधिकारी राऊत यांनी रक्तपेढी चालकांना दिल्या.
कोरोनाची दक्षता घ्या, भीती न बाळगता रक्तदानासाठी पुढे या
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचे प्रमाण कमी होत असल्याचे समोर येत आहे. रक्तदानातून कोरोनाचा संसर्ग होत नाही तसेच रक्तसंकलन ठिकाणी योग्य दक्षता घेतली जाते, त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, मात्र रक्तदानाविषयी भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
भीती घालवण्यासाठी पर्यायी रक्तसंकलन केंद्राचे नियोजन करा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात कोरोना रुग्णालय असल्याने तेथील रक्तपेढीत येण्यासाठी रक्तदात्यांच्या मनात भीती असू शकते यासाठी पर्यायी जागा शोधून रक्त संकलन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.