योजना गरजूंपर्यंत पोहचाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:20 PM2018-04-20T13:20:45+5:302018-04-20T13:20:45+5:30
विजयकुमार सैतवाल
गरजूंना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी इतर प्राथमिक सुविधांसोबतच आरोग्याच्या सुविधेकडेही विशेष लक्ष दिले जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात आरोग्याच्या बाबतीत नेहमीच रुग्णांची हेळसांड होत असल्याचा अनुभव नवा नाही. आताही पुन्हा गेल्या आठवड्यात एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने तिच्यासह नवजात बालकास तब्बल सात तास ताटकळत राहावे लागल्याचा दुर्दैवी अनुभव जिल्हा रुग्णालयात आला. त्यामुळे शासकीय योजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अर्थसंकल्प असो अथवा कोणत्याही घोषणा असो त्या वेळी शासकीय योजनांचा तसेच त्यासाठी तरतुदीचा पाऊस पडतो. मात्र प्रत्येक विभागातच त्या थेट तळागळापर्यंत पोहतात का असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. यामध्ये आरोग्याचा प्रश्नही अपवाद नाही. तसे पाहता आरोग्यासाठी विशेष तरतुदी करून सामान्यांचे आरोग्य उत्तम राखण्याकडे कल असतो. मात्र प्रत्यक्षात याची बोंब असल्याचा प्रत्यय वारंवार येत असतो. यामध्ये रुग्णवाहिका मिळविणे असो अथवा आरोग्य विमा असो, यामध्ये रुग्णांना सहसजासहजी काही मिळत नाही. त्यामुळे अखेर ते याचा नाद सोडून देतात.
असाच प्रत्यय जिल्हा रुग्णालयात गेल्या आठवड्यात एका महिलेला आला. प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर येथे महिलेची प्रसूती तर झाली, मात्र ज्या वेळी तिला घरी न्यायचे होते, त्या वेळी प्रसूत महिलांसाठी असलेल्या १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधूनही केवळ वेळ मारून नेण्यात आली. सकाळी ११ वाजता रुग्णवाहिका येईल, तेव्हा न आल्याने पुन्हा संपर्क साधल्याने १२ वाजता येईल, असे पुन्हा सांगण्यात आले. त्यामुळे महिलेला या योजनेचा कटू अनुभव आला. अखेर संध्याकाळी सहा वाजता या महिलेला खाजगी रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले. त्यामुळे या योजनेचा काय फायदा, असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. यावल तालुक्यातून जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या या महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने केवळ शासकीय योजनांचे गाजर दाखविले जात असल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करीत कोणीच लक्ष देत नसल्याने नातेवाईकाला अखेर वृत्तपत्राचा आधार घेऊन आपली आपबिती सांगावी लागल्याने शासन व योजना राबविणारेच योजनांबाबत किती गांभीर्य दाखवितात, असा सवाल या निमित्तीने उपस्थित केला जात आहे. आरोग्यासाठी असलेल्या आरोग्य विमा योजनाही सामान्यांना मिळविण्यासाठी कोणाकोणाचा आधार घ्यावा लागतो व त्यात त्यांच्या अज्ञानाचा कसा फायदा घेतलो जातो, याचे अनेक वाईट अनुभव आल्याचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक सांगत असतात. त्यामुळे शासकीय योजना खऱ्या गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी संबंधितांनी खºया अर्थाने प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.