सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:20+5:302021-01-23T04:17:20+5:30

जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट गावांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन स्वयंस्फूर्तीने करावे, ...

Plan to supply tap water to all the houses | सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करा

Next

जळगाव : जलजीवन मिशन अंतर्गत समाविष्ट गावांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन स्वयंस्फूर्तीने करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. या योजनेतून कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावे व सर्व घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होईल यासाठी नियोजन करावे, अशाही सूचना यावेळी पालकममंत्र्यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन सभागृहात शुक्रवारी दुपारी जलजीवन मिशन समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार शिरीष चौधरी, किशोर पाटील, सुरेश भोळे, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, ग्रामीण पुरवठा विभागाचे गजभिये, निकम यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावल व रावेर तालुक्यातील ६०३ गावांसाठी ६४१ कोटींचा आराखडा

जल जीवन मिशन ही महत्त्वपूर्ण योजना असून, या योजनेत राज्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्हा समाविष्ट असल्याने जिल्ह्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे, असे पालकमंत्री म्हणाले. या योजनेसाठी जिल्ह्यातील यावल व रावेर या तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यात ६०३ गावांचा ६४१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे सांगत जिल्ह्यात हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहनही त्यांनी यंत्रणांना केले.

शाळा व अंगणवाड्यांना प्राधान्याने पाणीपुरवठा करा

पाणीटंचाई असलेल्या गावांना पाण्याचा पुरवठा करताना पाण्याचे स्रोत निश्चित करण्यात यावे, यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या. शाळा व अंगणवाड्यांना पाण्याचा पुरवठा प्राधान्याने होईल यासाठी नियोजन करण्याची सूचनाही उपस्थितांनी केली.

Web Title: Plan to supply tap water to all the houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.