मतपेट्या पोहोचविण्यासाठी १४० बसेसचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:56+5:302021-01-13T04:40:56+5:30
जळगाव : येत्या १५ जानेवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावा-गावांमध्ये मतपेट्या पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १४० बसेसचे नियोजन करण्यात आले ...
जळगाव : येत्या १५ जानेवारी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावा-गावांमध्ये मतपेट्या पोहोचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १४० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या बसेसवर चालक आणि वाहक मिळून २८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनातर्फे निवडणुकांसाठी मतपेट्या पोहोचविण्याबाबत महामंडळाच्या जळगाव विभागाला नुकतेच पत्र देण्यात आले होते. या पत्रानुसार महामंडळाने जळगाव शहरासह जिल्हास्तरावर प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी १४० बसेसचे नियोजन केेले आहे. यामध्ये पाचोरा तालुक्यातील गावासाठी ४१ बसेस, भुसावळ तालुक्यासाठी १० बसेस, जामनेर २४, चोपडा १३, अमळनेर १९, चाळीसगाव २७ व यावलसाठी सहा अशा एकूण १४० बसेसचे नियोजन केले आहे. या बसेस प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणाहून मतपेट्या घेऊन संबंधित गावांना १४ जानेवारी रोजी सकाळी रवाना होणार आहेत. तसेच या बसेसवर १४० वाहक व १४० चालक असून, मतपेट्या पोहोचविण्यानंतर लगेच या बसेस आगारात जमा होतील व दुसऱ्या दिवशी मतदान झाल्यानंतर पुन्हा मतपेट्या घेण्यासाठी संबंधित गावांना जाणार आहेत.