तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:26+5:302021-04-26T04:14:26+5:30
सुशील देवकर संपूर्ण जगाला हैराण केलेल्या कोरोना संसर्गाने भारतात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर सर्वात गंभीर स्वरूप धारण केले. ...
सुशील देवकर
संपूर्ण जगाला हैराण केलेल्या कोरोना संसर्गाने भारतात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात तर सर्वात गंभीर स्वरूप धारण केले. त्या तुलनेत जळगाव जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात राहिली. आता संपूर्ण राज्यातच हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्ह निर्माण झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जळगाव जिल्ह्यात याबाबत अधिक सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे महिना, दीड महिन्यात ही कोरोनाची दुसरी लाट ओसरेल अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र ही लाट ओसरली म्हणजे झाले, असे समजून शांत बसलेले चालणार नाही. कोरोनाची पहिली लाट ओसरली, त्यानंतर प्रशासकीय पातळीवरही शिथिलता आली. तर नागरिक कोरोना गेलाच अशा थाटात लग्न, समारंभ, बाजारात गर्दी करू लागले. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दुसरी लाट आली. त्यातच कोरोनाच्या व्हायरसचा नवीन स्ट्रेनही आल्याने दुसरी लाट अधिकच धोकादायक बनली. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षाही दुसऱ्या लाटेत अधिक मृत्यू झाले. तसेच रुग्ण गंभीर होण्याचे व त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज भासण्याचे प्रमाण वाढले. एक वेळ अशी आली की जळगाव शहर व जिल्ह्यात ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड मिळणे मुश्कील झाले होते. ऑक्सिजनच्या टंचाईची झळही बसू लागली होती. मात्र ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गमावण्याची वेळ सुदैवाने कोणत्याही रुग्णावर आली नाही. एप्रिलच्या मध्यापासून जळगाव जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर होऊन आता रुग्णसंख्येत हळूहळू घट होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरू लागली असल्याचे संकेत जाणकारांकडून दिले जात आहेत. ही जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब मानली जात आहे. बाहेरगावाहून विशेषत: परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची स्टेशन व बसस्थानकावर चाचणी केली जात असल्यानेही कोरोना संसर्गाला आळा घालण्यात यश येत आहे. अशीच परिस्थती राहीली तर महिना, दीड महिन्यात परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात येऊ शकेल. मात्र त्यानंतर पहिल्या लाटेनंतर जी चूक केली, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी लोकांना व लोक ती काळजी घेतील, यावर लक्ष ठेवण्याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठीचे काही नियम दुसरी लाट ओसरल्यावरही कायम ठेवणे अपेक्षित आहे. त्यात सार्वजनिक कार्यक्रमांवर असलेली बंधने कायम ठेवायला हवीत. बाजारातील गर्दीला आळा घालण्यासाठी व्यावसायिकांच्या वेळांचेही नियोजन करावे लागेल. त्यासोबत लसीकरणाची गतीही वाढवावी लागणार आहे. तरच तिसऱ्या लाटेला रोखणे शक्य होईल.