प्लॅस्टिकबंदीसाठी हवी इच्छाशक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:13 PM2019-06-07T12:13:45+5:302019-06-07T12:14:11+5:30
आज प्रत्येक जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, तेल, औषधी किराणामालाच्या वस्तू, सलाईनच्या बाटल्या, वाहनांचे स्पेअर पार्ट, स्टेशनवरील चहा, बिस्कीटाचे पुडे ...
आज प्रत्येक जीवनावश्यक वस्तू म्हणजे दूध, तेल, औषधी किराणामालाच्या वस्तू, सलाईनच्या बाटल्या, वाहनांचे स्पेअर पार्ट, स्टेशनवरील चहा, बिस्कीटाचे पुडे या आणि अशा शेकडो वस्तू कशात बांधल्या आहेत? उत्तर आहे, प्लॅस्टिकमध्ये. प्लॅस्टिकची निर्मितीच जर टनावारी होते तर हे प्लॅस्टिक जाईल कुठे ? दुसरी बाब, अगदी आदर्श परिस्थितीत समजा, जनतेने कचरा कचरापेटीतच टाकला तरी याचे पुढे काय करायचे? हा जाळता वा पुरता येणार नाही. पुनर्प्रक्रिया सध्यातरी होत नाही. उद्या झाली तरी ती प्रदूषणरहित असेलच असे सांगता येत नाही. या परिस्थितीत या प्रदूषणासाठी जवाबदार कोण? प्लॅस्टिक निर्माते का या बद्दल उदासीन सरकार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्लॅस्टिकबंदीसाठी सर्वांचा पुढाकार व इच्छाशक्तीची खरी गरज आहे. पूर्वी तेल, तूप, दूध यासाठी बरण्या नेत होतो, आता तेच करावे लागणार असून किराणा माल बेताचा असेल तर कागदी पिशवचीत, जास्त असेल तर कापडी पिशवीत नेणे याच सवयी जडवून घ्याव्या लागतील. या बंदीमुळे सर्वात मोठा प्रश्न प्लॅस्टिक निर्मात्यांचा येईल, ज्याच्यावर लाखो लोकांचे पोट भरते. यावर उपाय म्हणजे त्यांच्यासाठी पर्यायी व्यवसाय सुरू करणे. अर्थात हे स्थित्यंतर अतिशय कठीण आहे. परंतू प्लॅस्टिकचे भयानक दुष्परिणाम म्हणजे कॅन्सर व अनेक आजारांचे वाढते प्रमाण, प्लॅस्टिककचरा अडकल्याने मिठी नदीला आलेला पूर, जमिनीची घटती गुणवत्ता या गोष्टी जनतेला पटवून दिल्या तर जनता स्वत:हून प्लॅस्टिकला नाकारेल.
- सुजाता देशपांडे, अध्यक्ष, भारती पर्यावरण प्रतिष्ठान