गिरणा नदीच्या काठावर तीन हजार ‘सीड्स बॉल’चे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:14 AM2021-06-04T04:14:30+5:302021-06-04T04:14:30+5:30
जागतिक सायकल दिनानिमित्त उपक्रम : मातोश्री वृद्धाश्रमातही करणार वृक्षारोपण लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून ...
जागतिक सायकल दिनानिमित्त उपक्रम : मातोश्री वृद्धाश्रमातही करणार वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून शहरातील १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन व मू.जे. एनसीसी युनियनच्या वतीने कानळदा परिसरातील गिरणा नदीपात्राच्या काठावर गुरुवारी तब्बल तीन हजार ‘सीड बॉल’चे रोपण करण्यात आले.
शासनाच्या वतीने वृक्षारोपण व त्यांच्या संवर्धनासाठी विविध योजना राबविण्यात येत असतात. मात्र, आता वृक्षसंवर्धनासाठी एनसीसी छात्र सैनिकांनी पुढाकार घेतला आहे. १८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन व मू.जे. एनसीसी युनियनच्या २० छात्र सैनिकांनी तब्बल दहा हजार सीड्स बॉल तयार केले आहेत. कांताई धरण ते कानळदापर्यंतच्या गिरणा नदीपात्राच्या काठावर तसेच शहरातील विविध ठिकाणी या सीड्सचे रोपण केले जाणार आहे. गुरुवारी जागतिक सायकल दिनानिमित्त कर्नल प्रवीण धिमण, सुभेदार मेजर कोमलसिंग, लेफ्टनंट योगेश बोरसे यांच्यासह २० एनसीसी छात्र सैनिकांनी सकाळी ८.३० वाजता सायकल रॅली काढून कानळद्यातील गिरणा नदीपात्र गाठले. त्यानंतर त्यांनी कडुलिंब, हाडगा, शिवगा, देवकपाशी, बेल या वृक्षांचे सीड बॉल नदी पात्राच्या काठावर खड्डे करीत रोपण केले व वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
वृक्षांसोबत आजी-आजोबांची घेणार काळजी...
५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सावखेडा परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात एनसीसी छात्रसैनिक व वृद्ध आजी-आजोबांच्या हस्ते ४० वृक्षांचे रोपण केले जाणार आहे. विशेष म्हणजे, या दिवशी एनसीसी छात्र सैनिक दोन वर्ष वृद्धाश्रमात रोपण केलेल्या वृक्षांसह आजी-आजोबांना दत्तक घेऊन दोन वर्ष काळजी घेणार, अशी प्रतिज्ञा घेणार आहे. त्यात आजी-आजोबांना रेशन पुरविला जाणार आहे, तर त्यांना कपडेदेखील वाटप केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर त्या आजी-आजोबांच्या मुलांना संपर्क साधून आई-बाबांना पुन्हा घरी नेण्याची विनंतीसुद्धा छात्र सैनिकांकडून केली जाणार आहे.