नाल्याच्या पाण्याचा वापर करून वाचवली बागेतील झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 06:38 PM2019-06-07T18:38:54+5:302019-06-07T18:40:36+5:30
भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनी परिसरातील जंगली महादेव मंदिराजवळील संजनी पार्क (बगीच्या) येथे नाल्याच्या पाण्याचा वापर करून झाडे जगविण्यात यश आले आहे.
भुसावळ, जि.जळगाव : येथील प्रोफेसर कॉलनी परिसरातील जंगली महादेव मंदिराजवळील संजनी पार्क (बगीच्या) येथे नाल्याच्या पाण्याचा वापर करून झाडे जगविण्यात यश आले आहे.
उन्हाळ्यात या पार्कच्या बोरिंग आटू लागल्या व पार्कमधील झाडे जगवण्याचे आव्हान उभे राहिले. यावर तोडगा काढत पार्क शेजारून जाणाऱ्या बलबलकाशी नाल्यातील पाण्याचा वापर आपण झाडे जगवण्यासाठी करू शकतो, ही संकल्पना आमदार संजय सावकारे याच्या मनात आली. दोन महिन्यांपासून बगीच्यामधील झाडांना नाल्यातील फिल्टर झालेले हेच पाणी देण्यात आले व बगीच्यामधील झाडे वाचवण्यात यश आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर फिल्टरचे लोकार्पण जागतिक पर्यावरणदिनाच्यानिमित्ताने त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदारांनी पाणी व झाडांचे महत्व सांगितले व प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. हा उपक्रम सार्वजनिक ठिकाणी करण्यात आला. असे उपक्रम सर्वांनी आपल्या घरातील सांडपाण्याचा वापर करून वृक्ष लागवड करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रतिष्ठा महिला मंडळाच्यावतीने हा पार्क उभारण्यात आला आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्या हस्ते संजनी पार्कचे लोकार्पण आॅनलाइन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, किशोर पाटील, अजित चौधरी, अनिल चौधरी, सुनील शुक्ला, सोपान खडसे, मुरलीधर टेकाळे, भरत पिंपळे, श्रद्धा चौधरी, सरला सावकारे, अनिता आंबेकर, सपना जंगले, लीना टेकाळे, मीनाक्षी पिंपळे, वैशाली भदाणे, अर्चना सोनवणे, मनीषा काकडे, सुनंदा भारुळे, मंगला पाटील, आभा दरगड, युवराज पाटील, रवींद्र पाटील, दीपक बाविस्कर, लल्ला चांदणे व नागरिक उपस्थित होते.