कासोद्याच्या अवलियाने सतत पाच वर्षे पाणी देवून जगविली झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 12:12 PM2021-06-12T12:12:39+5:302021-06-12T12:17:00+5:30
मधुकर ठाकूर या ग्राम पंचायत कर्मचाऱ्याने गत पाच वर्षांपासून ५० रोपांना पोटच्या मुलाप्रमाणे जगविले आहे. यामुळे ही रोपे आता वृक्षांत रूपांतरीत होत आहेत.
प्रमोद पाटील
कासोदा, ता. एरंडोल : वृक्षारोपण करणे सोपे आहे, पण ते जगविणे, वृक्ष जगविण्यासाठी धडपड करणे हे तसे जिकिरीचे काम आहे. मात्र पाच वर्षापूर्वी लावलेल्या रोपांना स्वतःच्या मुलाप्रमाणे जगवून, वाढवून त्यांचे यशस्वी संगोपन केले आहे. असे जवळपास ५० वर रोपे आज मोठ्या वृक्षांत परिवर्तित होत आहेत. या वृक्षांना जगविण्यासाठी धडपड करणाऱ्या मधुकर ठाकूर या ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा कासोदावासीयांना सार्थ अभिमान आहे.
पावसाळ्याला यंदा सुरुवात झाली आहे. सालाबादप्रमाणे सर्वत्र वृक्षारोपणाचे जोरदार इव्हेंट आता पहावयास मिळतील. अनेक सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी यंदादेखील वृक्षारोपण कार्यक्रम राबवतील. वृक्षारोपणाचे फोटो सोशल मीडियात बरीच मोठी जागा बळकावतील. वृक्षारोपण करून आपण खूप मोठे देशहिताचे कार्य केले, हेदेखील संदेश एकमेकांना दिले जातील. वृक्षारोपण करणे हे खरोखर देशहिताचेच कार्य आहे, ते केलेच पाहिजे, पण फक्त फोटो सेशनपुरते नको, अशादेखील प्रतिक्रिया काही जण व्यक्त करतील.
हे असे प्रकार आपण नेहमीच अनुभवत आहोत. पण कासोद्यातील मधुकर जुलाल ठाकूर या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने पाच वर्षांपूर्वी ५० वर झाडे लावली होती. त्याचे पावसाळा, हिवाळा व कडक उन्हाळ्यात व्यवस्थित संगोपन करून कासोदा ते एरंडोल या राज्य मार्गावर ग्राम सचिवालयासमोर व स्मशानभूमीत नेत्रसुखद हिरवळ फुलवली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेणारी ही वृक्ष पाच वर्षे अव्याहतपणे स्वतः पाणी देऊन जगवणे तसे खूप जिकिरीचे काम होते. पण या अवलिया कर्मचाऱ्याने ते मोठ्या नेटाने व सातत्याने केले आहे.
आजही झाडे मोठ्या दिमाखात, ऐटीत उभी आहेत. अर्थात ग्रामपंचायतीने याठिकाणी नळ काढून पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. तरी पण दररोज तेथे येऊन नळाचे पाणी प्रत्येक झाडाला पोहचवणे, यालादेखील तळमळ व जिद्द हवी असते. ती या कर्मचाऱ्याने दाखवली व ही रोपे आता वृक्ष होऊ पहात आहेत. यंदा ग्रामपंचायतने या झाडांना तारांची जाळी लावून संरक्षणदेखील करून दिले आहे.