आता जीएमसीतच होणार प्लाझ्मा संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:17 AM2021-05-09T04:17:32+5:302021-05-09T04:17:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : प्लाझ्मा थेरीपीसाठी एक महत्त्वाचे पाऊल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी टाकले आहे. या ठिकाणी असलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्लाझ्मा थेरीपीसाठी एक महत्त्वाचे पाऊल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी टाकले आहे. या ठिकाणी असलेली प्लाझ्मा फेरेसीस या मशीनला अर्थात प्लाझ्मा संकलनाला ड्रग कंट्रोलर सेंटर ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली असून उर्वरित काही प्रक्रिया पूर्ण करून साधारणत आठवडाभरात या ठिकाणीच प्लाझ्मा संकलित करून तो रुग्णांना देता येणार आहे.
केंद्राकडून परवानगी मिळाल्याची अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी माहिती दिली. शासकीय पातळीवर प्लाझ्मा थेरेपीला मान्यता मिळाल्यानंतर जळगावात प्लाझ्मा फेरेसीस हे मशीन आणण्यात आले होते. मात्र, त्याला आवश्यक असणाऱ्या परवानगीअभावी ते पडून हेाते. जळगावातील स्थानिक अन्न व औषध प्रशासन विभागाला याच्या परवानगीसाठी फाईल पाठविण्यात आली होती. त्यानंतर ती नाशिक तेथून दिल्ली असा या फाईलचा प्रवास झाला. मात्र, याला मोठा कालावधी लागला व अखेर केंद्राकडून याला मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, प्लाझ्मा जर कोणत्या रुग्णाला द्यायचा असेल तर त्यासाठी आधी रेडक्रॉस रक्तपेढीतून तो संकलित करून नंतर जीएमसीत रुग्णाला दिला जाता होता. आता याच ठिकाणी संकलनही होणार आहे.
दात्याच्या शरीरातून रक्तातील प्लाझ्मा वेगळे करणारे मशीन, त्याची साठवणूक करण्यासाठी फ्रीज अशी ही यंत्रणा आहे. दरम्यान, केंद्राकडून मंजुरी मिळताच अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी तातडीने रक्त संक्रमण समितीची बैठक घेतली. यावेळी मशीनला आवश्यक अन्य साहित्य, त्याच्या अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आकाश चौधरी, डॉ. विजय गायकवाड आदी उपस्थित होते.
अशी होईल सुरुवात
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयाकडे असलेल्या बाधित होऊन बरे झालेल्या रुग्णांना संपर्क केला जाईल. तयार असणाऱ्या दात्यांचे समुपदेशन करून त्यांच्या विविध तपासण्या केल्या जातील. त्यानंतर ॲन्टीबॉडीज बघून त्यांचा प्लाझ्मा घेतला जाईल. त्यानंतर निकषानुसार तो रुग्णांना देण्यात येईल. रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.