जळगावात रुजतेय प्लाझ्मा दानाची चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:16 AM2021-05-11T04:16:32+5:302021-05-11T04:16:32+5:30
अनेक दाते येताहेत पुढे : रक्तपेढ्यांमध्येही प्लाझ्मा उपलब्ध लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणारा प्लाझ्मा ...
अनेक दाते येताहेत पुढे : रक्तपेढ्यांमध्येही प्लाझ्मा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणारा प्लाझ्मा आता रक्तपेढ्यांमध्ये सहज उपलब्ध होत आहे. दातेही पुढे येत असून मागेल त्यांना प्लाझ्मा दिला जात आहे. विशेष म्हणजे ३१६ प्लाझ्मा दान झाले आहे.
प्लाझ्मा थेरपी ही १०० वर्षापासून प्रचलित असलेली वैश्विक महामारीत उपयुक्त पद्धती आहे. या थेरपीचा वापर १९१८, २००२, २००९, २०१३ मध्ये देखील करण्यात आला आहे. २०१९ पासून सुरु असलेल्या कोविड – १९ च्या आजाराच्या रुग्णांमध्ये ‘प्रायोगिक तत्त्वावर’ वापर करण्यास जागतिक आरोग्य संघटना व भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने मान्यता दिलेली आहे.
प्लाझ्मा थेरपी कोणासाठी उपयुक्त ?
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने मध्यम स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णावर ज्यांना ताप, दम लागणे, श्वसनाची गती २४ प्रति मिनिट पेक्षा जास्त व ऑक्सिजनची पातळी ९३ टक्के पेक्षा कमी (शक्यतो ८८ ते ९३ टक्के असलेल्या व आजाराच्या गंभीर अवस्थेत रूग्णांना सदर थेरपी द्यावी असे सुचविले आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट २०२० पासून प्लाझ्मा दानाला सुरुवात झाली. त्यानंतर आता दुसऱ्या लाटेत याचे महत्त्व आणखी वाढले असून अनेक दाते देखील यासाठी पुढे येत आहे. गेल्या आठवड्यातच एकाच कुटुंबातील दोन सदस्यांनी प्लाझ्मा दान केले. सध्या जळगावातील दोन रक्तपेढ्यांमध्ये प्लाझ्मा थेरपी सुरू आहे. मात्र यातील एका रक्तपेढीकडे किट नसल्याने प्लाझ्मा संकलन होत नाहीये. तर इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे ३१६ प्लाझ्मा संकलन झाले आहे. विशेष म्हणजे यापैकी २५६ जणांना प्लाझ्मा दान करण्यात आले आहे.
प्लाझ्मा दान करण्यापूर्वी दात्याची एक दिवस अगोदर तपासणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातात व सदर व्यक्ती ठणठणीत असला तरच प्लाझ्मा घेतला जातो.
संकलित प्लाझ्मा वजा ४० अंश तापमानात साठवणूक केली जाते आणि त्याची एक वर्षापर्यंत मुदत असते.
गरजूंना प्लाझ्मा घ्यायचा झाल्यास ते थेट रक्तपेढीत जाऊन प्लाझ्माची मागणी करू शकतात. सध्या प्लाझ्मा उपलब्ध असल्याने दाते देण्याचीही आवश्यकता भासत नाही.
प्लाझ्मा दानासाठी जाण्यापूर्वी दात्याने नाष्टा अथवा जेवण करूनच गेले पाहिजे तसेच आपली शारीरिक क्षमता लक्षात घेऊन प्लाझ्मा दान करावे.