कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा दान करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 09:38 PM2020-08-10T21:38:02+5:302020-08-10T21:38:13+5:30
जळगाव : कोरोनावर आजतागायत कुठलेही औषध अथवा लस उपलब्ध झालेली नाही. तथापि, कोरोनामुक्त झालेला रुग्ण २८ दिवसानंतर कोणत्याही लक्षणाशिवाय ...
जळगाव : कोरोनावर आजतागायत कुठलेही औषध अथवा लस उपलब्ध झालेली नाही. तथापि, कोरोनामुक्त झालेला रुग्ण २८ दिवसानंतर कोणत्याही लक्षणाशिवाय राहिल्यास त्याचा प्लाझ्मा दुसऱ्या बाधित रुग्णाला देता येतो. कोरोना आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा जर कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करुन इतर रुग्णांचे जीवन वाचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
प्लाझ्मा दान ही प्रक्रिया रक्तदान प्रकियेप्रमाणेच आहे. १८ ते ६० वयोगटातील ज्या व्यक्तीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त आहे़ तसेच त्याचे हिमोग्लोबीन १२़५ पेक्षा जास्त आहे, अशी कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. जिल्ह्यातील जे नागरीक कोरोनामुक्त झाले आहे त्यांनी अथवा त्यांच्या परिचित ज्या व्यक्तीला कोवीड विषाणूचा संसर्ग झाला होता व त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे़ प्लाझा दानामुळे कोणताही धोका त्या व्यक्तीला पोहचत नाही, तसेच प्लाझ्मा दानामुळे दोन व्यक्तींचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनामुक्त व्यक्तीला त्यांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईकांनी प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले.