चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील खोलीचे प्लास्टर कोसळले, दोन्ही बालके वाचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 09:02 PM2021-05-01T21:02:58+5:302021-05-01T21:03:32+5:30
पोलीस वसाहतीतील एका खोलीच्या छताचे प्लास्टर शनिवारी कोसळले.
संजय पाटील
अमळनेर : अवघ्या चार महिन्यांपूर्वी उदघाटन झालेल्या पोलीस वसाहतीतील एका खोलीच्या छताचे प्लास्टर खाली कोसळले. ही घटना १ रोजी दुपारी चारला घडली. यात दोन्ही जुळे बालक सुरक्षित वाचले.
शहरातील ढेकू रोडवरील नवीन पोलीस वसाहतीचे उदघाटन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले होते. त्यानंतर पोलीस कर्मचारी तेथे राहायला गेले होते. १ मे रोजी दुपारी "बोरी" इमारतीत खोली नंबर तीनमध्ये राहणारे पोलीस कर्मचारी सचिन भागवत पाटील हे बाहेर गेलेले होते. त्यांच्या पत्नीने आपली साडेतीन वर्षांची जुळी मुले पंख्याखाली गादी टाकून झोपवले होते. अचानक छताच्या प्लास्टरचा तुकडा खाली पडला आणि लहान बाळांची आई सावध झाली. तिने क्षणाचाही विलंब न लावता, तत्काळ गादी ओढून बाजूला नेली. तेवढ्यात काही क्षणातच प्लास्टरचा मोठा भाग खाली कोसळला. सुदैवाने दोन्ही बाळ वाचले.
घटनेचे वृत्त पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कळवले.
दरम्यान, काही दिवसातच इमारतीचे छताचे भाग कोसळणे म्हणजे बांधकामच्या गुणवत्तेबद्दल संशय निर्माण होण्यासारखे झाले आहे. या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दोषी असल्यास ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
घटना गंभीर आहे. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याना अहवाल पाठवण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कार्यवाही होईल.
-जयपाल हिरे, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, अमळनेर