प्लॅस्टिक बंदीमुळे जळगावात २२ व्यापाऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:04 PM2018-03-18T12:04:11+5:302018-03-18T12:04:11+5:30
शिल्लक मालाचे काय करावे ?
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १८ - प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामुळे जळगावातील सात कंपन्यांसह २२ प्लॅस्टिक वस्तू विक्री करणाºया व्यापाºयांवर संकट ओढावले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे या होलसेल व्यापाºयांसह लहान-लहान शेकडो व्यावयायिक चिंतातूर झाले आहेत. दरम्यान, सरकार प्लॅस्टिक बंदीची १८ मार्चपासून अंमलबजावणी करण्याचे म्हणत असले तरी अद्याप व्यापारी अथवा जळगाव जिल्हा दूध संघाकडेही या बाबत कोणतेही परिपत्रक अथवा सूचना आलेल्या नाहीत.
राज्य सरकारने प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीची घोषणा केल्याने जळगावातील सात प्लॅस्टिक ग्लासच्या कंपनीसह प्लॅस्टिकचे कप, ग्लास, ताट, चमचे विक्रेते चिंतातूर आहेत. या वस्तूंची जळगावात मोठी उलाढाल असून येथून हा माल जळगाव शहर, जिल्हा तसेच मराठवाडा, विदर्भातही जातो. जळगावात वरील वस्तूंचे २२ होलसेल व्यापारी असून प्रत्येक दुकानावरून एका लग्नासाठी साधारण दोन हजार ग्लास, ताट, चमचे, कप यांची विक्री होत असते.
कर्जाचा डोंगर
जळगावात या व्यवसायाची मोठी उलाढाल असल्याने प्रत्येक व्यापाºयाने २५ ते ३५ लाखाचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. अचानक व्यवसाय बंद करायचा झाल्यास कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न या व्यापाºयांपुढे आहे.
बेकरी व्यावसायिकही चिंतीत
प्लॅस्टिक पिशवी बंदीचा बेकरी व्यवसायावरही परिणाम होणार असल्याने तेदेखील चिंतीत झाले आहेत. कारण बेकरीतील पाव, ब्रेड, खारी या वस्तू पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशवीचाच वापर केला जातो. जर यावर बंदी आली तर सरकारने काय पर्याय उपलब्ध करून दिला आहे, असा सवाल व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
थर्माकोल बंदीने विक्रेत्यांसह कारागिरांवरही संकट
थर्माकोल विक्री करणाºया दुकानदारांसह शहरात थर्माकोलपासून लग्न समारंभात लागणाºया शोभेच्या वस्तू तयार करणारे कारागिरदेखील शहरात आहेत. त्यांच्या व्यवसायावरदेखील याचा परिणाम होऊन बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.
सर्वच व्यवसायांवर होणार परिणाम
प्लॅस्टिक वस्तू विक्रेत्यांसह कागदी ग्लास पॅकिंग, चॉकलेट पॅकिंग, तपकीर डबी पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशवीचाच वापर केला जातो. या सर्वांवरही याचा परिणाम होणार असल्याने सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी व्यापाºयांकडून केली जात आहे.
साठ्याचे काय करावे ?
सरकार अचानक प्लॅस्टिक बंदीची घोषणा करते व त्याची दोन दिवसात अंमलबजावणी करीत असल्याने सध्या व्यापारी, उत्पादकांकडे जो माल शिल्लक आहे, त्याचे काय करावे, असा प्रश्न व्यापाºयांसमोर उभा राहिला आहे. एका दिवसात अचानक माल कोठे न्यावा, त्याचे काय करावे, गुतंवणुकीचा मोबदला कसा मिळणार या विवंचनेत व्यापारी वर्ग आहे.
व्यापाºयांना सूचना नाही
प्लॅस्टिक बंदीची घोषणा सरकारने केली, हे केवळ बातम्यांमधून समजत आहे त्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना अथवा परिपत्रक मिळाले नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके काय करावे, या संभ्रमात व्यापारी आहेत.
दूध संघाला अद्याप परिपत्रक नाही
जळगाव जिल्हा दूध संघाचाही कारभार मोठा आहे. दूधासाठी ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या पिशव्यांचा वापर होतो. यासाठी या पिशव्यांच्या वापरास सरकार मुभा देत असून त्या दूध विक्रेत्यास परत कराव्या लागणार आहे. खान्देशसह मराठवाडा व विदर्भ मिळून जळगावात दररोज चार लाख दूधाच्या पिशव्या तयार होतात. मात्र सरकारच्या या धोरणाबाबत अद्याप जळगाव जिल्हा दूध संघाकडे कोणतेही परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्लॅस्टिक बंदीमुळे शहरातील जवळपास २२ व्यापाºयांना याचा फटका बसून अनेकांवर बेरोजगारी ओढावली जाणार आहे. यामुळे एक प्रकारे संकटच ओढावले असून बँकांचे कर्ज कसे फेडावे, याची चिंता आहे. या बाबत मात्र अद्याप कोणत्याही सूचना नाही.
- सुभाष तोतला, संचालक, जळगाव प्लॅस्टिक बॅग ट्रेडर्स असोसिएशन.
प्लॅस्टिकवर बंदी हा पर्याय नाही. प्लॅस्टिक सर्वांचीच नित्याची गरज झाली असून त्याची विल्हेवाट कशी लावावी यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे.
- रमेश माधवानी, संचालक, जळगाव प्लॅस्टिक बॅग ट्रेडर्स असोसिएशन.