चोपड्यात प्लॅस्टिक बंदी कागदोपत्रीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 11:16 PM2019-09-22T23:16:24+5:302019-09-22T23:19:16+5:30

पथकाने बदलला पंचनामा : ५ हजारांचा दंड आला पाचशेवर!

Plastic ban paperwork | चोपड्यात प्लॅस्टिक बंदी कागदोपत्रीच

चोपड्यात प्लॅस्टिक बंदी कागदोपत्रीच

Next



चोपडा : शहरात नगरपालिका पथकाने कारवाई करीत दुकानदाराकडून प्लॅस्टिक जप्त केले. तसेच दंडही वसूल केला. मात्र, ५ हजार रुपयांचा पंचनामा बदलून संबंधित दुकानदाराकडून केवळ ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. यावरून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री दाखविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
२१ सप्टेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी पाऊच विक्रेता सचिन हुकूमचंद जैन या दुकानदाराकडून पालिकेच्या पथकाने ५०० पाणी पाऊच पकडल्या. याचा कायदेशीर पंचनामा शहरातील दोन जबाबदार नागरिकांसमोर करण्यात आला होता. मात्र सदरील ५ हजार रुपये दंडाचा पंचनामा बदलवून निव्वळ ५०० रुपये दंडाचा पंचनामा दाखविण्यात आला. त्यामुळे या पथकातील सदस्य हितसंबंध जोपासत असून दंडाची रक्कम कमी केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. शेकडो नागरिकांसमोर ५ हजार दंडाचा पंचनामा केल्याची माहिती शहर समन्वयक शुभम पाटील, किशोर पवार यांनी उपस्थित पत्रकारांना दिली होती. मग दंडाची पावती ५०० रुपये कशी झाली? यावरुन शहरभर संशय व्यक्त केला जात आहे.
नगरपालिका प्रवेशद्वाराजवळ आरोग्यासाठी हानिकारक प्लॅस्टिक पिशव्या विकत असल्याची माहिती प्रशासनास मिळाली होती. त्यावरून मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक व्ही.के.पाटील, शहर समन्वयक शुभम पाटील, किशोर पवार, विजय शिरसाठ यांनी ही कारवाई केली. या कारवाईची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

पालिकेचा दुजाभाव
गेल्या आठवड्यात १३ रोजी पथकाने शहरातील अनेक दुकानदारांकडून प्रत्येकी ५ हजार दंडाची तर काहींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली होती. मग सदर विक्रेत्यावर फक्त ५०० रुपये दंडाचीच कारवाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Plastic ban paperwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.