पारोळ्यात प्लॅस्टिक बंदीची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 08:58 PM2019-09-08T20:58:19+5:302019-09-08T20:58:46+5:30
पारोळा : शहरात ७ रोजी अचानक प्लॅस्टिक बंदीची धडक मोहीम राबविण्यात आली. मग काय, कारवाईच्या भीतीने बाजारपेठेतील सर्व दुकाने ...
पारोळा : शहरात ७ रोजी अचानक प्लॅस्टिक बंदीची धडक मोहीम राबविण्यात आली. मग काय, कारवाईच्या भीतीने बाजारपेठेतील सर्व दुकाने क्षणात बंद झाली. बाजारपेठेत शुकशुकाट झाला. शेकडो दुकानदार व व्यावसायिक हे थेट नागरपालिकेवर धडकले आणि अचानक मोहीमेबाबत रोष व्यक्त केला.
शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास प्लॅस्टिक बंदीची मोहीम अचानकपणे अभियंता विनोद इन्शुलकर यांनी राबविली. नगरपालिकेच्या १० ते १२ कर्मचा-यांचे पथक कारवाईसाठी निघाले. ज्या दुकानात प्लॅस्टिक कॅरीबॅग आढळून आली त्यांना जागेवर पाच हजार रुपयांचा दंड आकारून वसूल करण्यात आला. तर काहींना दंडाची पावती देण्यात आली. यामुळे अचानक राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे दुकानदारांमध्ये घबराट निर्माण झाली. प्रत्येक दुकानदाराकडे कॅरीबॅग असल्याने सर्वांनी कारवाई होण्याच्या भीतीने पटापट दुकाने बंद केली आणि संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट झाला.
दुकनदारांनी नगरपालिकेत जाऊन खेळणी साहित्याच्या प्लॅस्टिक वस्तू दाखवत त्यावरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली. तसेच अनेक प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी शेकडो व्यापारी, छोट-मोठे व्यावसायिक यांनी पालिकेत गर्दी केली होती. नगरसेवक मनिष पाटील यांनी कार्यलयीन अधिक्षिका यांची भेट घेत सर्वांना नोटिसा व वेळ द्या, मग कारवाई करावी, असे सांगितल्यावर ही कारवाई थंडावली. व्यापारी, दुकानदारांना समजविण्यात आले. त्यानंतर दुकाने पुन्हा सुरू झाली.