कारवाई करून जमा केलेला प्लास्टिकचा माल पुन्हा विक्रेत्यांना केला विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:14 AM2021-01-14T04:14:05+5:302021-01-14T04:14:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात प्लास्टिकबंदी असली तरी दुकानदारांकडून सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. त्यावर महापालिकेकडून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात प्लास्टिकबंदी असली तरी दुकानदारांकडून सर्रासपणे प्लास्टिकचा वापर केला जात आहे. त्यावर महापालिकेकडून किरकोळ कारवाया केल्या जात आहेत. मात्र, त्या कारवाईमध्ये जप्त केलेला माल अन्य विक्रेत्यांना विक्री करून ‘हेराफेरी’चे काम महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून केले जात असल्याचा प्रकार ‘एमआयएम’चे गटनेते रियाज बागवान यांनी उघडकीस आणला आहे. यामध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोपही बागवान यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांकडे तक्रारही केली आहे.
महापालिकेतील आता सर्वच योजना असो वा विविध कामे किंवा ठेके यांमध्ये अनेकांकडून ‘हेराफेरी’ करण्याचे काम हे सुरूच असते. कचऱ्याच्या ठेक्यावरून राजकारण सुरू असताना आता महापालिकेकडून सुरू असलेल्या प्लास्टिक कारवाईअंतर्गत जप्त करण्यात आलेले प्लास्टिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून इतर व्यावसायिकांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गणेश कॉलनी रोडवरील ख्वाजामिया दर्ग्याजवळ तीन व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली होती. त्यात सुमारे १३ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. या कारवाईबाबत ‘एमआयएम’चे गटनेते रियाज बागवान, ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष जिया बागवान यांनी आक्षेप नोंदविला आहे. प्लास्टिकची कारवाई नावालाच होत असून, प्रत्यक्षात दंडाची आकारणी केली जाते. मात्र, पावती दिली जात नाही. काही ठिकाणी पैशांची देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच ज्या ठिकाणी कारवाई केली, त्या ठिकाणचा माल महापालिकेच्या ताब्यात न ठेवता चक्क दुकानदाराच्या ताब्यात ठेवल्याचा गंभीर प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. ही संपूर्ण माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना दिली आहे. याबाबत महापालिकेच्या आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.