मुंबई येथे १६ ते २० जानेवारीदरम्यान ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०’ प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 09:46 PM2019-11-17T21:46:13+5:302019-11-17T21:46:50+5:30
पत्रकार परिषद
जळगाव : प्लॅस्टिक उद्योगातील नवनवीन संशोधन, उत्पादने, बाजारपेठेची स्थिती या विषयी एकाच ठिकाणी माहिती होण्यासाठी आॅल इंडिया प्लॅस्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ या प्रदर्शनाचे १६ ते २० जानेवारीदरम्यान मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. या क्षेत्रातील अडीअडचणींविषयी तज्ज्ञ उद्योजक या प्रदर्शनात मार्गदर्शनही करणार आहेत.
या संदर्भात रविवारी जळगावात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी ‘प्लास्टीव्हीजन इंडिया २०२०’ आयोजन समितीचे अध्यक्ष कैलाश मुरारका, उपाध्यक्ष किशोर संपत, जळगावचे प्रकल्प प्रमुख रवींद्र लढ्ढा, जळगाव प्लॅस्टिक रि-प्रोसेसिंग इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष तथा प्रदर्शन समितीचे समन्वयक विनोद बियाणी, लघु उद्योग भारतीचे उपाध्यक्ष रवी फालक, सचिव समीर साने, समन्वयक संतोष इंगळे उपस्थित होते.
या प्रदर्शनाविषयी माहिती देताना कैलाश मुरारका यांनी सांगितले की, अशा प्रकारचे हे अकरावे प्रदर्शन असून ते मुंबई येथे बॉम्बे एक्सिबिशन सेंटर येथे होणार आहे. तब्बल एक लाख चौरस मीटर क्षेत्रात हे प्रदर्शन होणार असून यामध्ये २५ देशातील दीड हजार उद्योजक सहभागी होणार आहे. या प्रदर्शनास युएफआय या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन सर्वोच्च समितीसह भारत सरकारने मान्यता दिली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या प्रदर्शनासाठी देशभर ५०हून अधिक रोड आयोजित केले असून त्याद्वारे अडीच लाखाहून अधिक व्यावसायिक, पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.
या प्रदर्शनात कृषी, सौरऊर्जा, आॅटोमेशन, डाय आणि मोल्ड, वेस्ट मॅनेजमेंट आणि थ्री डी प्रिंटींग या क्षेत्रातील अनुभवी उद्योजक त्यांचे उत्पादन, सेवे संदर्भात मार्गदर्शन आणि सादरीकरण करणार आहेत. तसेच संस्था आणि उद्योजकांचा सत्कारही करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.