वर्षभरात पंधरा दिवस रात्री १२पर्यंत वाजवा रे वाजवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:40 AM2021-01-13T04:40:58+5:302021-01-13T04:40:58+5:30
जळगाव : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी ...
जळगाव : जिल्ह्यात वर्षभरात एकूण १५ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी मिळालेल्या सवलतीचा लाभ घेताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार रात्री १० पर्यंत ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी असते. परंतु, सण, उत्सवासाठी वर्षभरात १५ वेगवेगळ्या दिवसांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत वाजविण्यास सरकारने परवानगी दिली आहे. हे १५ दिवस कोणते, ते ठरविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ याकाळात रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सूट असलेले सण, उत्सवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), महाराष्ट्र दिवस (१ मे), गणेशोत्सव पाचवा दिवस (१४ सप्टेंबर), गणेशोत्सव सातवा दिवस (१६ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (१९ सप्टेंबर), नवरात्रोत्सव अष्टमी (१३ ऑक्टोबर), नवमी (१४ ऑक्टोबर), ईद-ए-मिलाद (१९ ऑक्टोबर), दीपावली (४ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर), वर्षअखेर (३१ डिसेंबर) आदींचा समावेश आहे. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार परवानगी दिली जाणार आहे.
आदेशातील बाबींचे पालन करावे
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी सूट देताना उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनिप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सवलत राज्य शासनाकडून घोषित शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहणार आहे.