बॅण्डबाजा आता घरीच वाजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:17 AM2021-03-31T04:17:34+5:302021-03-31T04:17:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीसाठी आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाने ३१ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीसाठी आता नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यात नाईट कर्फ्यू रात्री १० ते सकाळी सात या वेळेत असेल तर लग्न घरच्या घरीच २० लोकांच्या उपस्थितीत करण्याचे निर्बंध आहेत. तसेच लग्न सोहळ्यांसाठी मंगल कार्यालय, हॉल, खुल्या सार्वजनिक जागा, लॉन्स यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मंगळवारी सायंकाळी उशिराने हे आदेश जारी केले. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. भाजी मंडई ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. त्यात विक्रेत्यांना एक दिवसाआड एक या प्रमाणे देण्यात यावे, त्याचे नियोजन महापालिका करेल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सॅनिटायझर, मास्क, हात धुण्याची व्यवस्था, पुरेसे शारीरिक अंतर राखले जावे. याची पाहणी ही जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी करावी.
भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्रे सकाळी ७ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू राहतील. अत्यावश्यक नसलेली दुकाने सकाळी सात ते सायंकाळी ७ या वेळेतच सुरू राहतील. हॉटेल, बार, रेस्टॉरंट ५० टक्के आसन क्षमतेने सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत तर पार्सल सुविधा रात्री १० पर्यंत सुरू राहील. शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. त्यात ऑनलाईन शिक्षण देता येईल. अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. सिनेमागृहे, मॉल, बगिचे, नाट्यगृह, प्रेक्षकगृह बंदच राहतील. क्रीडा स्पर्धा, मेळावे यांना बंदी घालण्यात आली आहे. राजकीय, सामाजिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम उत्सव हे बंद करण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे फक्त ५ लोकांच्या मर्यादेत पूजाविधीसाठी खुली राहतील. अंत्यविधीला २० जणांची परवानगी देण्यात आली आहे.
लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल, सार्वजनिक मोकळ्या जागेत लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे. वैधानिक सभा फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत घ्यावा. शक्यतो ऑनलाईन आयोजन करावे. निर्दशने, मोर्चे, रॅली यांना बंदी घातली आहे. खासगी आस्थापना आणि कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवाव्यात. शासकीय आणि निमशासकीय आस्थापनातील कर्मचारी ५० टक्के उपस्थिती (अत्यावश्यक सेवा वगळून) असे नियम लागू करण्यात आले आहेत.
काय आहे सुरू काय आहे बंद
काय आहे बंद
१) सर्व आठवडी बाजार
२) शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस, शिक्षण व प्रशिक्षण केंद्रे
३) सर्व सिनेमागृहे, मॉल, मनोरंजन पार्क, बगिचे, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे, सार्वजनिक ठिकाणे
४) क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे.
५) धार्मिक कार्यक्रम, सभागृहे, यात्रा, उत्सव, दिंड्या, ऊरुस, सामाजिक व राजकीय कार्यक्रम
६) लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स, सार्वजनिक मोकळ्या जागांवर केले जाणारे लग्न सोहळे
७) निर्दशने, मोर्चे, रॅली.
काय आहे सुरू
१) भाजी मंडई (५० टक्के क्षमतेने सुरू)
२) कृषी उत्पन्न बाजार समिती
३) भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, दूध विक्री केंद्र
४) इतर सर्व दुकाने मर्यादित वेळेत
५) हॉटेल, बार, रेस्टॉरंट, सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत आणि पार्सल सुविधा रात्री १० पर्यंत
६) अभ्यासिका (५० टक्के क्षमतेने)
७) जिम, स्पोर्ट्स कॉम्पलेक्स, जलतरण तलाव (फक्त राष्ट्रीय व राज्य खेळाडूंसाठी)
८) धार्मिक स्थळे (पाच लोकांच्या उपस्थितीत)
९) खासगी अस्थापना व कार्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये (५० टक्के उपस्थितीत)
दंडाच्या रकमेतही वाढ
विनामास्क आढळून येणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये, थुंकणाऱ्यास १ हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तर गर्दी करणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपये दंड केला जाईल. गर्दी करणाऱ्याला या आधी ५०० रुपये दंड होता, आता तो वाढवण्यात आला आहे.