कबड्डीचे मैदान गाजविणारा खेळाडू जीवनाच्या परीक्षेत हरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:15 AM2021-04-17T04:15:45+5:302021-04-17T04:15:45+5:30
फोटो : ७.१२ वाजेचा मेल. लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आई-वडील कामाला गेलेले असताना इकडे मुलाने राहत्या घरात गळफास ...
फोटो : ७.१२ वाजेचा मेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आई-वडील कामाला गेलेले असताना इकडे मुलाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास गोपाळपुरा भागात उघडकीस आली. कबड्डीचे मैदान गाजविणारा नितीन प्रदीप सोनवणे (२३,रा.गोपाळपुरा) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. दरम्यान, आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोपाळपुरा भागातील पाण्याच्या टाकीजवळ नितीन हा आई-वडिलांसह वास्तव्यास होता. वडील कुरिअरच्या दुकानात कामाला आहेत. तर नितीन हा भांड्याच्या दुकानात काम करीत होता. शुक्रवारी सकाळी आई-वडील कामाला निघून गेल्यामुळे नितीन हा घरात एकटा होता. दुपारी त्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
वडील घरी आल्यावर उघडकीस आली घटना
दुपारी २ वाजेच्या सुमारास वडील घरी परतले. त्यांनी घराचा दरवाजा उघडताच, त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसून आले. समोरचे दृष्य पाहिल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. तरूणाने गळफास घेतल्याची माहिती मिळताच, काही वेळातंच शनिपेठ पोलीस ठाण्यातील मनोज इंद्रेकर, किरण वानखेडे व रवींद्र पाटील यांनी घटनास्थळ गाठले. नंतर पंचनामा करीत मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी सीएमओ डॉ. निता भोळे यांच्या खबरीवरून शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नितीन उत्कृष्ट कबड्डी खेळाडू
जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह हलविल्यानंतर नातेवाईकांसह मित्रांची त्याठिकाणी एकच गर्दी झाली होती. मयत नितीन हा उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होता. विभाग व जिल्हास्तरावर तो कबड्डी खेळला असून त्याने टोकाचा निर्णय का घेतला असावा, असा सवालही मित्रांकडून उपस्थित होत होता. तर त्याचे जाण्याने मित्रांना देखील धक्का बसला होता. नितीन याच्या पश्चात आई-वडील व विवाहित बहिण असा परिवार आहे. तसेच त्याने आत्महत्या का केली हे अद्याप समजून आलेले नाही.