कोरोनाच्या कठीण काळात माणुसकीचा सुखद अनुभव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:28+5:302021-06-01T04:12:28+5:30
भुसावळ : सध्या कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक लोक अडचणीत आले आहेत. अशा गरजू महिलांना किराणा साहित्य वाटपाचे काम नुकतेच ...
भुसावळ : सध्या कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेक लोक अडचणीत आले आहेत. अशा गरजू महिलांना किराणा साहित्य वाटपाचे काम नुकतेच करण्यात आले.
भुसावळ येथील तापी स्टीलचे महेंद्र अग्रवाल यांच्या मातोश्री कमलाबाई अग्रवाल व बंधू सुनील अग्रवाल यांचे नुकतेच निधन झाले. पण, या दुःखातही महेंद्र अग्रवाल यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. स्नेहदीप या खान्देश अंधकल्याण संचलित निराधार महिला आश्रमातील अंध बांधव व निराधार भगिनींना किराणा वस्तूंचे वाटप करून त्यांनी आप्तांना वेगळ्या पध्दतीने श्रद्धांजली वाहिली.
हा कार्यक्रम लीलाई हॉल येथे शासकीय नियमांचे पालन करून पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समुपदेशन कक्षाच्या प्रमुख आरती सारंग चौधरी उपस्थित होत्या. मनोगत व्यक्त करताना त्यांनी अग्रवाल कुटुंबीयांचे कौतुक करून असे दानशूर लोक समाजात असल्याने या कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी समाजाला बळ मिळते आहे, असे सांगितले. याप्रसंगी प्रतीक महेंद्र अग्रवाल व खुशबू प्रतीक अग्रवाल हजर होत्या. आरती चौधरी यांच्यातर्फे मास्क देण्यात आले. खान्देश अंध कल्याण समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील व रतन पाटील हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाळू पाटील यांच्या पुढाकाराने झाले.
दानशूर व्यक्तींनी पुढे यावे
सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांपुढे दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात दानशूर व्यक्तींनी पुढे येत गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे, अशी अपेक्षा या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली.