३५ लाख रुपये व एक किलो सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेने रचला खुनाचा कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:50+5:302021-04-27T04:16:50+5:30
पती, पत्नीच्या खुनाचा झाला उलगडा : महिलेसह तिघांना केली अटक लोकमत न्यूज नेटवर्क आरोपींचे फोटो : २७ सीटीआर ३९ ...
पती, पत्नीच्या खुनाचा झाला उलगडा : महिलेसह तिघांना केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आरोपींचे फोटो : २७ सीटीआर ३९ (सुधाकर पाटील), २७ सीटीआर ४० (देवीदास श्रीनाथ), २७ सीटीआर ४१ (अरुणाबाई वारंगणे)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : व्याजाने घेतलेल्या १२ लाख रुपयांचा तगादा कायमचा मिटेल, त्याशिवाय पाटील दांपत्याकडे ३५ लाखांची रोकड व एक किलो सोन्याचे दागिने मिळतील, त्यातून सर्वांचीच आर्थिक चणचण दूर होईल या हेतूने मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा, ता.जामनेर), देवीदास नामदेव श्रीनाथ (४०), अरुणाबाई गजानन वारंगणे (३०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व तपास पथक उपस्थित होते.
तालुक्यातील कुसुंबा येथे ओमसाई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा बुधवारी रात्री खून झाला होता. गुरुवारी दुपारी ही घटना उघडकीस आली होती. अरुणाबाई हिने आशाबाईकडून बारा लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्याशिवाय सुधाकर व देवीदास हेदेखील कर्जबाजारी होते. त्यातून सुटका मिळण्यासाठी त्यांनी कट रचून खून केला होता. प्रत्यक्षात तेथे ८५ हजारांची रोकड व तीन ते चार लाखांचे दागिने मिळाले. आशाबाई यांनी जास्तीचे दागिने याच भागात राहणारी आई रुख्माबाई पाटील यांच्याकडे ठेवले होते.