शेतात नांगरटी केली अन् संपविले जीवन; १८ वर्षीय तरुणाची शेतात आत्महत्या, आई-वडिलांचा आधार हरपला
By विजय.सैतवाल | Published: June 14, 2024 10:14 PM2024-06-14T22:14:00+5:302024-06-14T22:14:21+5:30
देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. तेथे त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व आंघोळ करून पुन्हा शेतात गेला.
जळगाव : शेतात सकाळी नांगरटी केली आणि त्यानंतर शेतातच झाडाला गळफास घेत अलोक रवींद्र लुले (१८, रा. देव्हारी, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, १४ जून रोजी सकाळी ८:३० वाजता उघडकीस आली. वडिलांच्या अपघातानंतर शेतीकामात त्यांना मदत करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूमुळे या कुटुंबाचा आधार हरवला आहे.
देव्हारी येथे रवींद्र घुले यांचे शेत असून शुक्रवारी सकाळी त्यांचा मुलगा अलोक हा शेतात गेला होता. तेथे त्याने नांगरटी केली. त्यानंतर घरी आला व आंघोळ करून पुन्हा शेतात गेला. त्यानंतर त्याने तेथेच एका झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर शेजारील शेतातील मंडळींना अलोक हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. या विषयी त्यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. त्या वेळी अलोकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.
अलोक हा याच वर्षी इयत्ता अकरावी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी अपघात झाल्याने अलोक हा शेतीकाम संभाळत होता. त्याला एक लहान भाऊ आहे.