जामनेर येथे बालकाच्या गळ््याला चाकू लावून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 06:44 PM2019-02-11T18:44:31+5:302019-02-11T18:45:11+5:30
मध्यरात्री चोरट्यांचा थरार
जामनेर : शहरातील चार वेगवेगळ््या ठिकाणी रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन वर्षीय बालकासह महिला व पुरुषांच्या गळ््याला चाकू लावत लूट केली. प्राथमिक अंदाजानुसार या लुटीत सुमारे दोन लाखाचे सोन्या, चांदीचे दागिने व पाच हजाराची रोकड चोरट्यांनी लांबविल्याचा अंदाज आहे. जळगाव येथून आणलेल्या श्वान पथकाकडून दिवसभर चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. या घटनेने नवीन वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान वाकी रस्त्यावरील पाटीलवाडी भागातील रहिवासी व जिल्हा बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी भिमसिंग फत्तेसिंग पाटील यांच्या घराचा दरवाजा चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला. पाटील व त्यांच्या पत्नी सविता यांनी चोरट्यांना दरवाज्याबाहेरच रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. घरात घुसलेल्या चौघा चोरट्यांपैकी एकाने भिमसिंग यांच्या गळ्याला चाकू लावत त्यांना मागील खोलीत नेले व दोघांना खाली बसविले. एकाने सविता पाटील यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत, सहा ग्रॅम वजनाचे कानातील झुमके व सहा ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या लांबविल्या. पाटील यांच्या खिशातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. घटनेनंतर भयभित झालेल्या पाटील यांनी ही घटना पोलिसांना कळविली.
त्यानंतर पहूर रोडवरील श्रीकृष्ण नगरमधील राजू जोशी यांच्या घराकडे वळलेल्या सात ते आठ चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. जोशी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तलवार व बंदूका काढा, असा घरातून जोरात आवाज दिला. जोशी यांचा हा आक्रमकपणा पाहून चोरटे आल्यापावली माघारी परतले. जोशी यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली.
वाकी रोडवरील सम्राट अशोक नगरातील बी.एस.निकम यांच्या घरातील मागील दरवाजा तोडून चोरटे आत घुसले. त्यांनी निकम यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावली व घरातील काही वस्तू घेऊन पसार झाले. यात नेमके काय काय गेले हे समजू शकले नाही.
वाकी रस्त्यावरील शेवटचे टोक असलेल्या धनपुष्प कॉलनीतील पवन नरसिंह सपकाळ यांच्या घरात घुसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या तीन वर्षे वयाच्या अर्णव या मुलाच्या गळ््याला चाकू लावला. चोरट्यांनी पल्लवी सपकाळे यांच्या गळ््यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. अंधारात दिसत नसल्याने चोरटे बॅटरीच्या प्रकाशात मुद्देमाल हिसकावीत होते. सपकाळे यांच्या घरातून चार ग्रॅमची सोन्याची पोत, तीन ग्रॅमचे कानातील कर्णफूल व चार हातातील चांदीच्या मनगट्या लांबविल्या.
इतर घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावल्या
घटनेची माहिती रात्री पोलिसांना समजताच प्रदीप पोळ, नीलेश घुगे, रमेश कुमावत, ईस्माईल शेख, तुषार पाटील यांनी चोरट्यांच्या शोधार्थ वाकीरोडसह इतर परिसर पिंजून काढला. सोमवारी सकाळी जळगाव येथून आलेल्या श्वान पथकाने एका घरात चोरट्याचा राहिलेला बुट व टोपी सुंगविली. चोरी करणारे हिंदीत बोलत होते. तसेच त्यांनी डोक्यावर टोपी व तोंडाला रुमाल बांधला असल्याचे सांगण्यात आले. धनपुष्प कॉलनीत घुसलेल्या चोरट्यांनी इतर घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावल्याचे सांगण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी संशयितांच्या शोधासाठी गुरु गणेशनगरमध्ये गुजरातेतून कामासाठी आलेल्या आदिवासी वस्तीत श्वान आणले होते.