‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 04:56 PM2022-06-23T16:56:51+5:302022-06-23T16:57:11+5:30

PM Kisan : जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते.

PM Kisan's money is not recovered, no new recovery for four months | ‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

‘पीएम किसान’चे पैसे वसूलच होत नाही, चार महिन्यांपासून नवीन वसुली नाही

Next

जळगाव : देशभरातील शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळावा, यासाठी सरकारने पीएम किसान योजना लागू केली. सुरुवातीला त्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांना फायदा दिला गेला. त्यानंतर सरकारने आयकरदात्या शेतकऱ्यांचे कर्जाचे हप्ते थांबवले आणि त्यांच्याकडून दिलेल्या लाभाची वसुली करण्यात आली. त्यात आतापर्यंत ५८४७ आयकरदात्या शेतकऱ्यांनी हे पैसे परत केले आहेत. तर ९,३०४ शेतकऱ्यांनी ८ कोटी ८ लाख ६०० रुपयांची रक्कम अद्यापही परत केलेली नाही.

जळगाव जिल्ह्यात या योजनेचे एकूण लाभार्थी ५ लाख ९ हजार २०१ लाभार्थी आहेत. मात्र ज्यांच्या नावावर शेतीही आहे आणि इतर नोकरी किंवा उद्योगातून उत्पन्न आहे आणि ते आयकर भरतात किंवा आयकर विवरण पत्र भरतात त्यांचे या योजनेतील लाभ काढून घेतले होते. त्यांच्याकडून ते शेतकरी नसल्याने ही वसुली करण्यात येत होती. मात्र गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून यात कोणतीही वसुली झालेली नाही.

पैसे परत करायला कुणीही येईना

जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरले आहेत, त्या १५ हजार १०१ शेतकऱ्यांकडून २०२१ मध्येच वसुलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यात पहिल्या टप्प्यातच ५८४७ शेतकऱ्यांनी स्वत:हून हे पैसे करत केले. मात्र नंतर कुणीही पैसे परत करायला पुढे आले नाही. त्यात सुरुवातीला प्रशासनाने वारंवार आवाहन देखील केले. मात्र अजून तरी त्याचा फायदा झालेला नाही.

खाती गोठवण्याचाही प्रयत्न

जिल्ह्यात ज्या ९३०४ अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचे पैसे परत केलेले नाही, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदारांना पत्र दिले होते. त्यात बँकांशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या खात्यातील हप्ते दिले गेले तेवढी रक्कम गोठवण्याच्या सूचना होत्या. मात्र अजून तरी त्यात फारशी प्रगती झाल्याचे दिसून येत नाही.

ई केवायसी की आधारसंलग्न?

सध्या ई केवायसी हे पीएम किसान योजनेतील मोठी अडचण आहे. मात्र आता ही योजना ई केवायसीपेक्षा आधारबेस्ड पेमेंटवर कार्यरत होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनेच काम सुरू असल्याचे योजनेशी संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अजूनही काही जणांचे ई केवायसी केले जात आहे. आधार बेस्ड पेमेंट झाल्यास ई केवायसीचा उपयोग राहणार नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

साडेपाच कोटींची झाली वसुली

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ८४७ शेतकऱ्यांकडून ५ कोटी ५४ लाख २६ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक जामनेर तालुक्यातील ६६६ शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत.

८ कोटी रुपये अद्याप लटकले

जळगाव जिल्ह्यात या योजनेत ९ हजार ३०४ शेतकऱ्यांकडून अद्यापही ८ कोटी ८ लाख ६ हजार रुपये वसूल करण्याचे बाकी आहेत. त्यात अमळनेर तालुक्यातील ९१८ शेतकरी आहेत, तर जळगाव तालुक्यातील ८५४ आणि यावल तालुक्यातील ८५५ शेतकरी आहेत.

Web Title: PM Kisan's money is not recovered, no new recovery for four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.