न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:13 AM2021-07-11T04:13:23+5:302021-07-11T04:13:23+5:30
स्टार डमी : ८९३ आनंद सुरवाडे जळगाव : न्यूमोकोकल बॅक्टेरिया हे बालकांमध्ये न्यूमोनिया होण्याचे प्रमुख कारण असून यापासून ...
स्टार डमी : ८९३
आनंद सुरवाडे
जळगाव : न्यूमोकोकल बॅक्टेरिया हे बालकांमध्ये न्यूमोनिया होण्याचे प्रमुख कारण असून यापासून संरक्षण होण्यासाठी आता न्यूमोकोकल लसीकरण मोहीम सर्वत्र राबविली जाणार आहे. जिल्ह्यातही एक वर्षाच्या आतील बालकांच्या या लसीकरण मोहिमेला १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. जिल्हाभरातील सर्व आरोग्य यंत्रणेत नियमित लसीकरणाबरोबरच ही लसही देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
न्यूमोकोकल आजार म्हणजे एक प्रकारचा न्यूमोनिया असून लहान मुलांना या आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने महाराष्ट्रात एक वर्षाआतील लहान मुलांना ही लस दिली जाणार आहे. यात सहा आठवड्यांच्या बालकांना पहिला डोस, पहिला डोस दिलेल्या १४ आठवड्यांच्या बालकांना दुसरा डोस व ९ व्या महिन्याला बुस्टर डोस दिला जाणार आहे.
बालकांचे मृत्यू
२०१८- १९ : ८४ मृत्यू, न्यूमोनियाने मृत्यू : ०४, प्रमाण : ५ टक्के
२०१९ - २० : ७० मृत्यू, न्यूमोनियाने मृत्यू : ४, प्रमाण : ६ टक्के
२०२०- २१ : ६२ मृत्यू, न्यूमोनियाने मृत्यू : ०२, प्रमाण : ३ टक्के
न्यूमोकोकल न्यूमोनिया म्हणजे काय?
न्यूमोकोकल आजार हा स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया या बॅक्टेरियामुळे होतो. त्याला न्यूमोकोकस असेही म्हणतात. हा जीवाणू शरीरातील विविध भागात पसरून वेगवेगळे आजार उत्पन्न करू शकतो. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा जीवाणू पाच वर्षांच्या आतील मुलांमधील न्यूमोनियाचे प्रमुख कारण आहे. न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते, त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो.
न्यूमोकोकलची लक्षणे काय
खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे आदी. जर आजार गंभीर असेल तर मुलांना खाण्या व पिण्यात अडचण येऊ शकते, फीट येऊ शकतात, ते बेशुद्ध होऊ शकतात व मृत्यूदेखील होऊ शकते.
जिल्ह्यात सर्व आरोग्य यंत्रणेत लस
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय या सर्व ठिकाणी नियमित लसीकरणासह न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन देण्यात येणार आहे. या ठिकाणी नियमित लसीकरणासह हे व्हॅक्सिनही देण्यात येणार आहे.
कोट
न्यूमोकोकल लस ही एक वर्षाच्या खालील बालकांसाठी असून या लसीमुळे ८० टक्के सुरक्षितता प्राप्त होणार आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना जो धोका उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तेव्हा न्यूमोकोकल न्यूमोनियापासून बालकांचा बचाव होणार असल्याने ते बऱ्यापैकी सुरक्षित राहतील. सर्व पालकांनी आपल्या एक वर्षाखालील मुलांना ही लस द्यावी. - डॉ. समाधान वाघ, माता व बालसंगोपन अधिकारी