यात्रेतील सूर आणि गोंगाटाचे कवित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 11:43 PM2019-08-24T23:43:04+5:302019-08-24T23:43:30+5:30
महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या संकेतामुळे भाजपच्या काही जणांमध्ये उत्साह तर काहींमध्ये निराशा, एकनाथराव खडसेंविषयीच्या विधानाने संशयकल्लोळ ; गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांना दिले बळ
मिलिंद कुलकर्णी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तीन दिवस खान्देशात होती. ‘मी पुन्हा येईन’ अशी साद यात्रेत घालून मुख्यमंत्रीपदाची दावेदारी आणि विजयाचा आत्मविश्वास अशा दोन्ही गोष्टी त्यांनी प्रकर्षाने मांडल्या. अमळनेरला स्मिता वाघ आणि शिरीष चौधरी या दोघांचा नामोल्लेख करीत उमेदवारीवरील पडदा कायम ठेवला. पूर्वनियोजित दौरा बाजूला ठेवत पारोळ्यात यात्रा गेली आणि करण पवार यांच्यासाठी जनादेश मागून सेनेच्या चिमणराव पाटील यांना अस्वस्थ केले. खडसेंविषयीचे विधान तसे सामान्य होते, पण संशयकल्लोळाला बळ देणारे ठरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या खान्देशच्या टप्प्यात अडचणी येत होत्या आणि अखेर ही यात्रा गेल्या आठवड्यात आली. अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला. राज्याचा प्रमुख एखाद्या यात्रेसाठी निघणे तसे मोठे अडचणीचे असते. ती अडचण आलीच. कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळे त्यांना यात्रा अर्धवट सोडावी लागली. विरोधकांनी यात्रेवर टीका केली. परंतु, ही जनतेशी संवादासाठी यात्रा आहे, यात्रा ही भाजपची परंपरा आहे, विरोधक आमचे अनुकरण करीत असल्याचे प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
यात्रेत ऐनवेळी बदल झाले. धुळे आणि शहाद्यातील सभा रद्द झाली. बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहाद्यातील सभा रद्द होणे, स्वाभाविक होते. परंतु, चाळीसगाव आणि रावेर या भाजप आमदारांच्या मतदारसंघात यात्रा गेली नाही, त्याचे कारण मात्र उलगडले नाही. याउलट पारोळ्यात अचानक जाऊन अनेक शक्यतांना मुख्यमंत्र्यांनी बळ दिले आहे. भाजप-शिवसेना युतीविषयी निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, सेनेच्या चिमणराव पाटील यांच्यासारखा प्रबळ दावेदार असताना भाजपच्या करण पवार यांच्या नावाला समर्थन देणे यातून भविष्यात काय घडू शकते, याचे संकेत मिळतात.
नंदुरबार, धुळे जिल्ह्यात भाजपचे केवळ ४ आमदार आहेत. याउलट काँग्रेसचे ५ आमदार आहेत. याठिकाणी शक्ती वाढविणे हे भाजपच्या दृष्टीने निकडीचे होते. गिरीश महाजन आणि जयकुमार रावळ यांनी मोहीम राबवून दिग्गजांना पक्षात आणले आहे. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत, ज्येष्ठ नेते पी.के.अण्णा पाटील यांचे पूत्र दीपक पाटील हे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांचे विरोधक असतानाही त्यांना भाजपमध्ये आणून पक्षातील सत्तासंतुलन राखण्यात आले आहे. त्यासोबतच डॉ.गावीत यांचे समर्थक असलेल्या विजय पराडके, ईश्वर पाटील यांनाही भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. धुळ्यात ज्यांच्या नावांची चर्चा होती, त्या आघाडीतील कोणत्याही नेत्याने प्रवेश केलेला नाही. नेमके काय घडले हे अद्याप बाहेर आलेले नसले तरी भविष्यात घडामोडी घडणार नाहीत, असे सांगता येणार नाही. त्यामुळे ‘फिल्टर पॉलिसी’ हा मुख्यमंत्र्यांचा दावा हा बोलाचाच भात..ठरण्याची शक्यता आहे. जळगावातही मातब्बर असे कोणी आले नाही. भाजप-शिवसेनेची युती आणि त्यांच्यातील जागावाटप काय होते, त्यावर पुढील ‘इनकमिंग’ अवलंबून राहील, असाच याचा अर्थ राहील.
मीच उमेदवार आहे, हे खडसे यांनी अलीकडे जाहीर केले असले तरी त्यांच्याविषयी निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, हे मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याने संशयकल्लोळ वाढला आहे. खडसे यांच्याविषयी पक्ष काय भूमिका घेतो, हे नजिकच्या काळात कळेल, परंतु, तोवर राजकीय चर्चा रंगत राहणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाची संपूर्ण कारकिर्द पूर्ण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यातील परिपक्वता आणि आत्मविश्वास यात्रेत जाणवत होता. अनेक अडचणी असूनही त्यांनी ‘यात्रे’चा आग्रह कायम ठेवला. धुळे आणि भुसावळातील मुक्कामी त्यांनी ज्या भेटीगाठी घेतल्या; त्याचे दृष्य परिणाम काही दिवसात कळतील. चाळीसगाव,रावेर या भाजप आमदारांच्या मतदारसंघात यात्रा गेली नाही, खडसे यांच्यापेक्षा महाजन आणि रावळ यांना असलेले महत्व हे मुद्दे अजून काही दिवस चर्चेत राहतील.