भडगाव येथे कवी केशवसुत व्याख्यानमाला १८ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:37 PM2020-01-15T18:37:23+5:302020-01-15T18:38:24+5:30

कवी केशवसुत व्याख्यानमालेस २५ वषे पूर्ण झाले. या रौप्यमहोत्सवानिमित्त १८ ते २२ जानेवारी ही ५ दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे.

Poet Keshavsut Lecture at Bhadgaon from 1st January | भडगाव येथे कवी केशवसुत व्याख्यानमाला १८ जानेवारीपासून

भडगाव येथे कवी केशवसुत व्याख्यानमाला १८ जानेवारीपासून

googlenewsNext
ठळक मुद्देशोभायात्रा, ग्रंथदिंडीसह विविध कार्यक्रम संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष

भडगाव, जि.जळगाव : कवी केशवसुत व्याख्यानमालेस २५ वषे पूर्ण झाले. या रौप्यमहोत्सवानिमित्त १८ ते २२ जानेवारी ही ५ दिवसीय व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यात शोभायात्रा, ग्रंथदिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोहळा शहरातील बाळद रोड लगत डी.एड.कॉलेजच्या ग्राउंडवर होईल.
आद्य कवी केशवसुत यांचे भडगाव शहरांत चार वर्षे वास्तव्य होते. त्यांनी गिरणा नदीच्या किनाऱ्यावर बसून अनेक आशयगर्भ कविता रचल्या म्हणून त्यांना आद्यकवितेचे जनक असे म्हटले जाते. अशा नामांकित कवीची स्मृती चिरकाल टिकावी म्हणून १९९६ साली केशवसुत ज्ञानप्रबोधिनीची स्थापना करण्यात आली, ज्याद्वारे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी केले जाते. यंदाचे हे संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने रसिक श्रोत्यांना विविध उत्तोमत्तम कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .
१८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता केशवसुत वाचनालयापासून शोभायात्रा व ग्रंथ दिंडी निघेल. शोभायात्रेत विविध सामाजिक, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे सहभागी होणार आहेत. सायंकाळी पाचला व्याख्यानमालेचे उद्घाटन रानकवी ना.धों.महानोर यांच्या हस्ते व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रा.सदानंद देशमुख यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी पुस्तक प्रदर्शनाचेही उद्घाटन केले जाईल.
व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प सांगली येथील वक्त्या प्रा.प्रीती शिंदे या ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ या विषयावर गुंफतील.
१९ जानेवारी रोजी दुपारी अहिराणी कथाकथन होईल. धुळे येथील प्रा.योगिता पाटील, दोंडाईचा येथील प्रा.संजीव गिरासे व मालेगाव येथील यात सहभागी होतील. दुसरे पुष्पात रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, नारायण पुरी, नितीन देशमुख, भरत दौंडकर यांचे हास्य कविसंमेलन होईल.
२० रोजी विविध शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. रात्री तिसºया पुष्पात महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर हे ‘लोकराजे राजश्री शाहू महाराज’ या विषयावर मत व्यक्त करतील.
२१ रोजी स्थानिक कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठाद्वारे आपली कला सादर करतील व रात्री टीव्ही हास्यसम्राट प्रा.दीपक देशपांडे हे हास्यकल्लोळ हा विनोदी कार्यक्रम सादर करतील.
२२ रोजी शाहीर शिवाजी पाटील यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. व्याख्यानमालेचा समारोप सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड ह्या ‘मला भेटलेल्या लेकी सुना’ या विषयाने करतील, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी केशवसुत ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे, उपाध्यक्ष डॉ.विलास देशमुख, सचिव प्रा.डॉ.दीपक मराठे, ज्ञानप्रबोधिनी कार्यकर्ते नागेश वाघ, सुरेश भंडारी, प्रा.डॉ.दिनेश तांदळे, डॉ.ईश्वर परदेशी, डॉ.दुर्गेश रूळे, वैशाली शिंदे, योगेश शिंपी, अन्वर पठाण , सुनील कासार, साहेबराव जाधव उपस्थित होते.

Web Title: Poet Keshavsut Lecture at Bhadgaon from 1st January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.