दिव्यांग वाल्मिकची आधार बनली कविता
By admin | Published: May 5, 2017 05:20 PM2017-05-05T17:20:50+5:302017-05-05T17:20:50+5:30
महिंदळे येथील गरीब कुटुंबातील शिवाजी लाला पाटील यांचा दिव्यांग असलेला मुलगा वाल्मिक व गावातीलच प्रताप उदयसिंग पाटील यांची कन्या कविता यांचा विवाह 4 मे रोजी मोठय़ा थाटात पार पडला.
Next
महिंदळे ता. भडगाव,दि.5- लग्नाच्या रेशीम गाठी या स्वर्गात बांधल्या जावून पृथ्वीवर सत्यात उतरतात. महिंदळे येथील गरीब कुटुंबातील शिवाजी लाला पाटील यांचा दिव्यांग असलेला मुलगा वाल्मिक व गावातीलच प्रताप उदयसिंग पाटील यांची कन्या कविता यांचा विवाह 4 मे रोजी मोठय़ा थाटात पार पडला.
येथील जन्मापासून दोन्ही पायांनी अधू असलेला वाल्मिक हा जमिनीवर सरपटत चालतो. त्याचा विवाह जुळणे अशक्यच होते. वाल्मिकच्या लग्नाची आशा पूर्ण मावळलेली होती. त्यामुळे आई- वडिल चिंतेत होते. दैव कुणी जाणले, या म्हणीप्रमाणे गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या पुढाकाराने गावातीलच कविता हिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला. कविता ला काही प्रमाणात दृष्टीदोष आहे. मात्र घरकामात व शेतीकामात पूर्ण सक्षम असलेल्या कविताही वाल्मिकला होकार दिला. यानंतर दोघेही विवाह बंधनात अडकले. हसतमुखाने दोघांनीही सप्तपदी घेतली. या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी पूर्ण गाव उपस्थित होता.
वाल्मिक दोन्ही पायांनी अधू असला तरी शेतातील संपूर्ण कामे करतो. घरुन बैलगाडी स्वत: जुपून घेवून जाणे, शेतात वखरटी व छोटी छोटी कामे तो करतो. गायीचे व म्हशीचे दुध काढणे अशी अनेक कामे तो करतो. दुस:यावर आपण अवलंबून राहता कामा नये असे त्याचे मत आहे.