मुख्यमंत्र्यांच्या रद्द दौऱ्याचे कवित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:56 PM2018-04-03T16:56:26+5:302018-04-03T16:56:26+5:30
गिरीश महाजन प्रबळ होत असताना एकनाथ खडसे गटाच्या नाराजीत वाढ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जळगाव दौरा रद्द झाल्यानंतर त्याची कारणमिमांसा करण्यात समाजमाध्यमे व राजकीय कार्यकर्ते यांच्यात चढाओढ दिसून आली. भाजपामधील खडसे-महाजन गटातील वादाची किनार जशी त्याला होती, तशीच विविध समाजघटकांमधील नाराजीला घाबरुन मुख्यमंत्री आले नाहीत, अशी मल्लीनाथी करण्यात आली. मुख्यमंत्री हेदेखील माणूस आहेत, त्यांची प्रकृती बिघडू शकते हे मात्र नजरेआड केले गेले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारचा जळगाव दौरा रद्द झाला आणि रद्द होण्याच्या कारणांविषयी विलक्षण कल्पनाविलास रंगविला गेला. प्रकृती अस्वास्थ्य हे कारण पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले. प्रशासनाला सकाळी निरोप मिळाला असला तरी कारण सांगितले काय आणि काय सांगितले, हे बाहेर आलेले नाही. त्यामुळे प्रकृती अस्वास्थ्य हे कारण आतातरी समोर आलेले आहे. मात्र राजकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की, त्यात बुध्दिबळासारखे डाव खेळले जातात, त्यामुळे साध्या सरळ कारणावर लगेच विश्वास बसत नाही. मुख्यमंत्री हेदेखील माणूस आहेत, तेही आजारी पडू शकतात, यावर आमचा विश्वास बसत नाही. ‘राजकीय आजार’ आम्हाला परिचित असतो. कारण अशी उदाहरणे भूतकाळात घडून गेल्याने सामान्य माणसाला दोष देऊन चालणार नाही.
राज्याचा प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांवर सर्वच विषयांची जबाबदारी येते. देवेंद्र फडणवीस हे लिलया ही जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या काळात एवढी आंदोलने झाली नसतील, तेवढी फडणवीस यांच्या काळात झाली. परंतु फडणवीस यांनी ती चांगल्या पध्दतीने हाताळली, हे नाकारुन चालणार नाही. मग तो किसान लाँग मार्च असो की, अण्णा हजारे यांचे नवी दिल्लीतील उपोषण असो. एक मात्र खरे आहे, की केंद्र व राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी, जीएसटी, रेरा हे कायदे एकाच वर्षात आणल्याने उद्योग आणि व्यापार क्षेत्रापुढे अडचणी वाढल्या. त्यात पुन्हा महामार्गावरील दारू दुकाने बंदी किंवा अॅट्रॉसिटी कायद्याविषयीच्या न्यायालयीन निकालांमुळे संबंधित घटक नाराज झाले. प्लॅस्टिक बंदीसारखा घिसाडघाईने आणलेला नियम असो की, कर्जमाफीविषयीच्या नियमांमध्ये रोज होणारे बदल असो, उद्योजक-शेतकºयांमध्ये संतप्त भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. ही नाराजी राज्य सरकारविषयी आहे. हे चित्र एकीकडे असताना नांदेड, नंदुरबारसारखे अपवाद सोडले तर भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळाले. समाजघटकांमधील नाराजीचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसून आला नाही. अगदी खान्देशात शहादा, तळोदा, शिंदखेडा, दोंडाईचा या पालिका भाजपाने जिंकल्या. याचा अर्थ असा घेता येऊ शकतो की, नाराजी ही तात्कालिक राहते. दुसरे म्हणजे, भाजपा आता निवडणूक तंत्रात पारंगत झाला आहे. नाराजीचे परिवर्तन सकारात्मक करण्याची जादू त्यांना अवगत झाली आहे.
त्यामुळे प्रकल्पग्रस्त, गाळेधारक किंवा आणखी कोणी नाराज घटक मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार होते, सभेत गोंधळ घालणार होते, म्हणून ते आले नाही, या युक्तीवादात फारसे तथ्य वाटत नाही. आता परवा दिल्लीत हजारेंचे उपोषण सोडत असताना मुख्यमंत्र्यांच्या दिशेने जोडा आलाच की...त्यामुळे सार्वजनिक जीवनातील व्यक्तींना या गोष्टींची सवय झालेली असते, असे म्हणायला हरकत नाही.
पवार आणि खडसे यांच्यासोबत व्यासपीठ टाळले गेले, असा एक युक्तीवाद केला गेला. त्यात फार काही तथ्य वाटत नाही. जैन इरिगेशनच्या आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्कार सोहळ्याला गेल्यावेळी हे तिघे एका व्यासपीठावर हजर होते. राज्यात अनेक ठिकाणी पवार आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर अनेकदा पहायला मिळतात. राहिला प्रश्न खडसे यांचा तर खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा पक्षात सन्मान ठेवला जातो, अशी भावना स्वत: मुख्यमंत्र्यांनी अनेकदा जाहीर केली आहे. विधिमंडळ किंवा विधिमंडळाबाहेर खडसे यांनी आपली नाराजी, सरकारकडून खान्देशवर होणारा अन्याय, सरकारी कामकाजातील शिथिलता याविषयी वेळोवेळी टीकास्त्र सोडले आहे. परंतु दोघांमध्ये कटुता आहे, असे जाणवत नाही. खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई मंदिरासाठी ९ कोटी रुपयांचा निधी, त्यांच्या मागणीवरुन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर करण्यात आला. त्यामुळे दोघांमध्ये वितुष्ट आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी टाळले, असे म्हणण्यात अर्थ वाटत नाही.
एक मात्र खरे आहे, खडसे यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री फडणवीस हे बळ देत आहे. किसान मोर्चा, अण्णा हजारे यांचे आंदोलन, धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्या प्रकरण...प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली. राज्याच्या राजकारणात महाजन यांचे वजन वाढविणाºया या घटना आहेत. नाशिकच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असताना महापालिका तसेच काही पालिकांमध्ये भाजपाची सत्ता आणण्यात त्यांनी यश मिळविले. ही त्यांची कामगिरी पक्षश्रेष्ठींच्यादृष्टीने जमेची आहे.
युतीमधील घटक पक्ष शिवसेनेशी त्यांचे स्थानिक पातळीवर चांगले संबंध आहेत. जामनेरमध्ये सेनेने केवळ एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे, जळगावात महापालिका निवडणुकीत दोघांची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाजन प्रबळ होत असताना खडसे गट नाराज होणे स्वाभाविक आहे. त्याचे पडसाद जाहीर कार्यक्रमात चिमटे घेण्यात उमटतात. पण तेवढेच.
जामनेरात गटबाजीचा परिणाम? , ये अंदरकी बात है, खडसे हमारे साथ है अशी घोषणा जामनेरात काँग्रेस-राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी मध्यंतरी दिली होती. महाजन यांनी गडाची बांधबंदिस्ती भक्कम केली आहे. परंतु खडसे यांच्या नावाने काँग्रेस आघाडी गोंधळ उडविते काय, गटबाजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतो काय याची उत्सुकता राहणार आहे.
गुलाबरावांविषयी प्रेमाची कबुली , भाजपाच्या स्वागत फलकावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो टाकल्याने महाजन-वाघ गटाने पाटील यांच्या असलेल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. ही कबुली देताना खडसे यांचा फोटो पाटील यांच्यानंतर टाकल्याने या गटाला डिवचले आहे. भुसावळात सावकारे हे महाजन यांचे फोटो टाळतात, त्याला हे प्रत्युत्तर तर नव्हे?
- मिलिंद कुळकर्णी