बालकांसह सर्वानाच बालविश्वात घेऊन जाणारा काव्यसंग्रह ‘सावल्यांचं गाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:01 PM2017-12-05T17:01:53+5:302017-12-05T17:02:21+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात बाल साहित्यिक माया दिलीप धुप्पड यांच्या ‘सावल्यांचं गाव’ या बालकवितासंग्रहाचा रवींद्र मोराणकर यांनी थोडक्यात करून दिलेला परिचय.
फुलात जसा सुगंध लपलेला असतो तसंच मोठय़ा माणसांमध्येही एक अवखळ बालमन लपलेलं असतं, दडलेलं असतं. म्हणूनच मोठय़ांच्या भावविश्वात रमून आपल्याच भाव-भावना बालकवयित्री माया दिलीप धुप्पड यांनी ‘सावल्यांच्या गावं’ या बालकविता संग्रहात मांडलेल्या आहेत. कवितेचं गाव, सावल्यांचं गाव, मामाचं गाव हे आनंद देणारे. या गावात मनीमाऊ, वाघोबा, बेडूक, ससा, कासव, कांगारू, सिंह, उंट, शेळी असे किती तरी प्राणी आहेत, या सगळ्यांशी बोलायला, त्यांच्यासोबत गायला नि नाचायला या कवयित्री कवितेच्या रूपातून बोलवतात. इंद्रधनुष्याचे रंग पहायला, सावल्यांच्या गावामध्ये कवयित्री स्वागत करतात. ‘वा:याची खोडी’, ‘पावसाची गाणी’, ‘गाऊ अक्षरांची गाणी’ या बालकवितासंग्रहानंतर ‘सावल्यांचं गाव’ हा बालकवितासंग्रह वाचकांच्या मनावरही अधिराज्य गाजविणारा ठरणारा आहे. पालकांनी मुलांसाठी ‘सावल्याचं गाव’मधील एक गीत रोज गावं आणि कवितेच्या गावा जावे’, अशी कवयित्रीची धारणा आहे. कवयित्री : माया दिलीप धुप्पड, प्रकाशक : अमित प्रकाशन, मूल्य : 80 रुपये, पृष्ठे : 32