कवयित्री बहिणाबाई : बहुवस्तू स्पर्शी प्रतिभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:41 AM2018-06-14T00:41:08+5:302018-06-14T00:41:08+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा.
बहिणाबाईची प्रतिभा बहुवस्तू स्पर्शी होती. ती बुद्धिमान आणि बहुश्रृत होती. अतिशय संवेदनशील होती. त्यामुळे तिच्या नजरेतून कुठलाही विषय, कुठलाही प्रसंग सुटला नाही. घरकाम असो की शेतीकाम, सुख-दु:खाचे प्रसंग असो की निसर्गातील दृश्य असो किंवा वेगवेगळ्या व्यक्तींच्या भेटीचा प्रसंग असो. या प्रत्येक वेळी तिची प्रतिभा जागृत असायची. तिच्या कवित्व शक्तीमुळे प्रत्येक प्रसंग गाण्याच्या रुपात व्यक्त होत असे. बहिणाबाई निरक्षर असूनसुद्धा या वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त होताना तिला शब्दांची अडचण कधी आली नाही. अगदी सहजरीत्या तिच्या लेवागण बोलीमध्ये उपमा, यमकांचा चपखल प्रयोग तिने केलेला आहे.
बहिणाबाईकडे विनोद बुद्धीही होती. काही ओव्या, म्हणी, शब्दचित्रे व भाषांमध्ये उपहासाबरोबर शब्दनिष्ठ व प्रसंगनिष्ट विनोद केलेला आहे. ‘नाही दियामधी तेल’ ही कविता प्रसंगनिष्ठ विनोदाचे उत्तम उदाहरण आहे. ‘अनागोंदी कारभार’मध्ये सोनार मडके भाजतो, तर कुंभार दागिने गढतो, सुतार कपडे शिवतो तर शिंपी लाकूड घडतो इत्यादी चित्रणातून बहिणाबाईने उपहासात्मक शैलीत अनागोंदी कारभार व बिघडलेल्या समाज व्यवस्थेचे सुरेख वर्णन केलेले आहे.
बहिणाबाईने रेखाटलेली काही व्यक्तीचित्रे ही अप्रतिम आहेत. नात्यातील माणसांचे केलेले वर्णन हुबेहुब तर आहेच, पण त्यातून नात्यातील ओलावाही स्पर्शून जातो. कमिटीचा शिपाई मुनीर, त्याची खुरटलेली दाढी, चकणे डोळे, हातात घडी, तोंडात विडी, तोंडात विडी असे विनोदी अंगाने केलेले वर्णन वाचून तो साक्षात डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचप्रमाणे छोटू भैय्या, रायरंग आदी व्यक्तीचित्रेही सजीव झालेली आहेत.
बहिणाबाईच्या संग्रहात काही म्हणीही आहेत. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय समर्पकपणे प्रकट करण्याचे सामर्थ्य म्हणींमध्ये असते. लोकजीवनात लोकानुभवातून अशिक्षित लोकही अशा सुंदर म्हणींचा वापर करताना दिसतात.
बहिणाबाईची पुढील म्हण, ‘‘दया नाही, मया नाही, डोयाले पानी, गोगलगायच्या दुधाचा काढा वो लोणी’’ अशीच नितांत सुंदर आहे. ज्याच्या हृदयात दुसऱ्याबद्दल प्रेम, करुणा नाही तरी डोळ्यात पाणी आहे म्हणजेच तो केवळ दिखावा आहे. गोगलगायच्या दुधाचे लोणी काढण्यासारखे अशक्यप्राय आहे. अशाप्रकारे, ‘‘मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात गेलं’’ यासारख्या म्हणी अप्रतिमच आहे.
बहिणाबाईची सामाजिक जाणीवही प्रगल्भ होती. हरिजनांच्या वस्तीतून जात असताना त्यांचे हालाखीचे जीवन तिच्या नजरेतून सुटत नाही. ‘‘देखा महारवाड्यात कशी मानसाची दैना’’ असे सांगत त्यांच्या दु:खमय जीवनाचे वर्णन ती करते. दारूभट्टीचे वर्णनही असेच वास्तववादी आहे. जिवंत असून मेल्यासारखी, तोंडाच्या चिलमा झालेली, हातात कवडी नसताना लाखोंच्या गोष्टी करणाºया माणसांचे चित्रण प्रत्ययकारी आहे.
बहिणाबाईची प्रतिभा अशी बहुवस्तुस्पर्शी आहे. कुठलाही विषय तिला वर्ज्य नाही. कुठलाही विषय असो त्याला तिने काव्याच्या कोंदणात सुरेख बसवला आहे. हा चमत्कार नि:संदेह बहिणाबाईच्या अलौकिक प्रतिभेचा आहे.
बहिणाबाईला भाषाशास्त्र अवगत असायचे कारणच नाही, पण तिने काही ओव्यांमध्ये भाषाशास्त्रीय गमती केल्या आहेत. अर्थात यातून बहिणाबाईचे निरीक्षण व चिंतनच दिसून येते. माय म्हणताना ओठ ओठाला भिडतो तर आत्या म्हणताना ओठात अंतर पडत, तात म्हणताना जीभ दातात अडते, तर काका म्हणताना मागे लपते, सासू म्हणताना तोंडातून वारा जातो. ह्या सर्व गमती भाषाशास्त्रीय आहेत. पण बहिणाबाईने त्यातून नात्यातील अंतर स्पष्ट केले आहे.
-प्रा.ए.बी. पाटील