शोषितांच्या भावना कवितांमधून व्यक्त करणारा काव्यसंग्रह : उन्हाळ झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:16 AM2018-06-17T01:16:31+5:302018-06-17T01:16:31+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी ज्येष्ठ कवी निंबाजीराव बागुल यांच्या ‘उन्हाळ झळा’ या काव्यसंग्रहाचा थोडक्यात करून दिलेला परिचय.
नंदुरबार स्थित ज्येष्ठ कवी निंबाजीराव हरिभाऊ बागुल यांचा ‘उन्हाळ झळा’ हा दुसरा काव्यसंग्रह आहे. समाजातील शोषित, कष्टाळू, श्रमिक वर्गाला ते आपल्या कवितेतून व्यक्त करतात. या काव्यसंग्रहात ५३ कवितांचा समावेश असून, निखळ सामाजिक प्रबोधनाला चालना मिळावी हा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण व शहरी वाड्या-वस्त्यातील सामान्य माणसांची व्यथा, वेदना बोलकी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विविध क्षेत्रातील प्रस्थापितांचा सर्व स्तरावरील शोषणाचा लेखाजोखा हा त्यांच्या कवितांचा विषय आणि आशय आहे. असे असले तरी कुणाच्या वैयक्तिक वा सांघिक भावनेवर कवितेतून त्यांनी प्रहार केलेला नाही. व्यापक सामाजिक हितसंबंध जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला आहे. तथापि, अमानवी विघातक प्रवृत्तीबद्दलचा सात्विक रोष व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे. याबाबत ‘शापित गाव’ या कवितेत कवी निंबाजीराव बागुल लिहितात,
हासूनी छेडण्याचा हा डाव माणसांचा,
पाठीत वार करण्याचा सराव माणसांचा.
फसवे मुखवटे हे नेमके गर्दीत झाकलेले, व्यथेवर मीठ, चोळण्याचा बनाव माणसांचा.
अशा काही कविता वास्तवतेचे भान जागवतात.
आपल्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची ससेहोलपट, दुष्काळाने ग्रामीण समाजाचा मोडलेला कणा, शेतकºयांच्या दिवसेंदिवस वाढत जाणाºया आत्महत्या, स्त्रियांचे सामाजिक शोषण, न संपणारा बेरोजगारीचा प्रश्न या काव्यसंग्रहातून मांडण्याचा कवीने प्रयत्न केला आहे.
कवी : निंबाजीराव बागुल , प्रकाशक : कुसुमाग्रज प्रकाशन, पृष्ठे ७६, मूल्य ८० रुपये.