कविता करतात संस्कारांची पेरणी- प्रा.वा.ना. आंधळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 03:48 PM2019-09-25T15:48:34+5:302019-09-25T15:50:51+5:30
मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शनिवारी झाले.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : माणसाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात कविता नानाविध रुपाने, प्रसंगाने भेटते. कवितेतून संस्कार मिळतात. ती ज्याला कळली तो धन्य समजावा. समाजहितैषी साहित्यधन जपून त्याचा प्रचार, प्रसार करणे हे आयुष्याचं संचित समजायला हवे, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक तथा धरणगाव येथील कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.वा.ना. आंधळे यांनी व्यक्त केली.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथे माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शनिवारी झाले. त्यात प्रा.आंधळे बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके होते.
विचारमंचावर संस्थाध्यक्ष प्रमोद शिवलकर, पुरणमल चौधरी, भालचंद्र कुलकर्णी, दामू सुरंगे, प्रभाकर सुशीर, वासुदेव पाटील यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.आर. वराडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगेश पाटील यांनी केले.
‘कविता आई होते तेव्हा’ हा विषय घेऊन कवी प्रा.आंधळे यांनी माणसाला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कविता कशी भेटत जाते? हे विविध प्रकारच्या कविता सादर करून समजावून सांगितले. ‘धरू नका ही बरे फुलावर उडती फुलपाखरे’ ही कविता लयबद्धपणे सादर करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या हृदयात स्थान मिळवले. उत्तरोत्तर रंगलेल्या या कार्यक्रमात त्यांनी किमान तीन पिढ्यांनी अभ्यासक्रमात अभ्यासलेल्या कविता प्रातिनिधिक स्वरुपात तोंडपाठ साभिनय सादर केल्या. त्यानंतर त्यांनी स्वलिखीत ‘आई मला जन्म घेऊ दे, तू जसे पाहिले जग मलादेखील पाहू दे, नको मारू आई मला जन्म घेऊ दे’ या कवितेची फ्रेम महाविद्यालयाला भेट दिली.