न्यायालयात वडिलांकडे बोट दाखवत साडेतीन वर्षाची मुलगी म्हणाली यांनीच मम्मीला मारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:17 AM2021-05-20T04:17:03+5:302021-05-20T04:17:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पक्षकार, साक्षीदार, वकील व इतर लोकांच्या गर्दीने फुल्ल भरलेल्या न्यायालयात सात वर्षाच्या मुलीने दिलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पक्षकार, साक्षीदार, वकील व इतर लोकांच्या गर्दीने फुल्ल भरलेल्या न्यायालयात सात वर्षाच्या मुलीने दिलेली साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्याने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पप्पू रतन पवार (३१ विवेकानंद नगर तांडा, पाचोरा) असे आरोपीचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांनी बुधवारी हा निकाल दिला.
पाचोरा येथील विवेकानंद नगर तांडा येथे पप्पू रतन पवार हा त्याची मयत पत्नी कस्तुराबाई (३०), मुलगी गौरी (७ वर्ष), भाग्यश्री (३.५ वर्ष)व खुशी (१.५ वर्ष) अशा तीन मुलींसह राहत होता. पप्पू पवार हा पाचोरा येथेच एका हॉटेलवर कामाला होता. त्याला दारू पिण्याचेसुद्धा व्यसन होते. ९ जून २०१९ रोजी रात्री पप्पू याने तुला मुलीच होतात असे म्हणत मद्याच्या नशेत पत्नीशी भांडण केले. या भांडणात लाकडी दांडा तिच्या डोक्यात टाकला. यात गंभीर जखमी झालेल्या कस्तुराबाई यांना शेजारी राहणाऱ्या भाऊ व वहिनीने पाचोरा येथील रुग्णालयात नेले, त्याठिकाणी तिला मयत घोषित करण्यात आले.
दरम्यान, या घटनेबाबत कस्तुराबाईची आई पद्मबाई सखाराम राठोड (६० रा.आनंद नगर तांडा, ता.एरंडोल) हिने पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून पप्पू पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. १० जून रोजी त्याला अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी दोषारोप दाखल केले.
दोन न्यायाधीशांसमोर चालला खटला
हा खटला सर्वप्रथम तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांच्यासमोर चालला. जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी त्यांच्यासमोर आठ साक्षीदार तपासले. नंतर त्यांची बदली झाली. त्यातही कोरोनाच्या निर्बंधामुळे खटला पुढे चालू शकला नव्हता. डिसेंबर २० मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी. जगमालानी यांच्या समोर सरकार पक्षाने उर्वरित दोन साक्षीदार तपासून पुरावा ठेवण्याचे काम पूर्ण केले. या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासले. यात प्रामुख्याने आरोपीची मोठी मुलगी गौरी हिने सर्व घटनाक्रम जसाचा तसा न्यायालयासमोर सांगितला. तुझ्या वडिलांना कोणी मारले, असे ढाके यांनी विचारले असता तिने न्यायालयात असलेल्या तिच्या वडिलांकडे बोट दाखवले. या व्यतिरिक्त स्वतः फिर्यादी पद्मबाई राठोड,डॉ.नीलेश देवराज, पंच साक्षीदार व उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्या साक्षी महत्त्वाच्या झाल्या. या खटल्यात दुसऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलीकडूनही घटना जाणून घेण्यात आली. न्यायालयाने पती पप्पू रतन पवार याला दोषी ठरवून जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान गुन्हा घडल्यापासून आरोपी पती पप्पू पवार हा कारागृहातच होता. न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सवर सुनावणी घेऊन शिक्षा ठोठावली.
एकाच आठवड्यात दोन शिक्षा
जिल्हा सत्र न्यायालयात एकाच आठवड्यात जन्मठेपेच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्या. या दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी पत्नीचा खून केलेला होता. गेल्या आठवड्यात सुनावण्यात आलेल्या शिक्षेत सरकारी वकील विद्या राजपूत यांच्या खून प्रकरणात पती डॉक्टर भरत पाटील याला जन्मठेप तर सासरे लालसिंग पाटील याला चार वर्षाची कैद अशी शिक्षा आली होती.